इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बागेश्वर धामचे पीठाधीश धीरेंद्र कृष्ण शास्त्री आणि वाद हे समीकरण काही केल्या संपायला तयार नाही. मागील काही महिन्यांपासून धीरेंद्र शास्त्री वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. दरम्यान दहा व्यक्तींची तंतोतंत माहिती दिल्यास तीस लाख रुपये देण्याचे चॅलेंज त्यांना करण्यात आले आहे.
धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा मीरा रोड येथे दरबार भरणार असल्याचे सांगितले जात आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जादूटोणा आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालत असल्याचा आरोप करत बागेश्वर बाबांविरोधात मीरा रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच बागेश्वर बाबांनी १० लोकांची खरी खरी माहिती द्यावी. त्यांनी १० लोकांची योग्य माहिती दिल्यास त्यांना ३० लाख रुपये दिले जाईल, असे थेट आव्हान दिले आहे. अंनिसचे श्याम मानव यांनी हे आव्हान दिले आहे.
बागेश्वर बाबांनी आमचे आव्हान स्वीकारले नाही किंवा योग्य माहिती देण्यास अपयशी ठरले तर त्यांच्याकडे कोणतीही दिव्यशक्ती नसल्याचे स्पष्ट होईल, असे श्याम मानव यांनी म्हटले आहे. श्याम मानव यांनी मीरारोड पोलीस ठाण्यात तसे पत्र दिले आहे. बागेश्वर बाबा हे जादूटोणा करतात. मंत्र म्हणून आजार बरा करण्याचा दावा करतात. हा प्रकार अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा आहे. यूट्यूबवर बागेश्वर बाबांचे अनेक व्हिडिओ आहेत. त्यावरून ते अंधश्रद्धेला खतपाणी घालत असल्याचे स्पष्ट होते, असे श्याम मानव यांनी या पत्रात म्हटले आहे. तसेच बागेश्वर बाबांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Bageshwar Baba Dhirendra Shastri Open Challenge 30 Lakh Rupees