अयोध्या (उत्तर प्रदेश) – श्रीरामजन्मभूमी परिसरात भव्य राममंदिराचे बांधकाम वेगाने सुरू आहे. पायाभरणीच्या दुसर्या टप्प्याअंतर्गत छताच्या कामाचे ९० टक्के पूर्ण झाले आहे. एप्रिल २०२० मध्ये श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्त संस्थेची स्थापना झाली. मंदिराच्या कामासाठी भाविकांनी समर्पण निधी दान करण्यास सुरुवात केली. श्रीरामावर असलेल्या दृढ श्रद्धेमुळे दीड वर्षाच्या आतच पाच हजार कोटींहून अधिक समर्पण निधी जमा झाला आहे. प्रसिद्ध कथावाचक मोरारी बापू यांनी सर्वाधिक ११ कोटी रुपयांचा निधी दान केला आहे. पाटणा येथील महावीर विश्वस्त संस्थेने आतापर्यंत चार कोटींचा निधी दिला आहे.
विश्वस्त संस्थेचे खाते उघडल्यानंतर जाहिराती आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून भाविकांना दान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या वर्षीच्या १५ जानेवारीपासून २७ फेब्रुवारीपर्यंत निधी समर्पण अभियान चालविले होते. या वर्षी लेखापरीक्षणाच्या अहवालात ३५०० कोटी रुपये दान करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. परंतु विश्वस्तांच्या माहितीनुसार, राममंदिरासाठी आतापर्यंत पाच हजार कोटी रुपयांहून अधिक दान मिळाले आहे.
भाविकांची राममंदिराबद्दल इतकी दृढ आस्था आहे की, कोरोना काळात संपूर्ण देश थांबलेला असताना २०२० एप्रिल आणि मे महिन्यात ४.६० कोटी रुपयांचे दान विश्वस्त संस्थेला मिळाले होते. श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्त संस्थेच्या कार्यालयाचे प्रभारी प्रकाश गुप्ता सांगतात, बांधकामासाठी दान केलेल्या निधीचा ओघ सुरूच आहे. कार्यालयात दररोज हजारो रुपये रोख आणि धनादेश मिळत आहेत.
ते सांगतात, की आतापर्यंत राममंदिरासाठी प्रसिद्ध कथावाचक मोरारी बापू यांच्या भक्तांकडून सर्वाधिक ११ कोटी रुपयांचे दान मिळाले आहे. पाटणा येथील महावीर विश्वस्त संस्थेने दहा कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. मुख्य विश्वस्त किशोर कुणार यांनी पाच वर्षात प्रत्येकी दोन कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. महावीर विश्वस्त संस्थेकडून आतापर्यंत चार कोटी रुपये दान मिळाले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक कोटी रुपये दान देले आहेत. संघ कार्यकर्ते सीयाराम यांच्याकडून एक कोटी, मुंबईतील चैतन्य सेवा विश्वस्त संस्थेतर्फे एक कोटी रुपये दान करण्यात आले आहेत. बँक खाते उघडले त्यावेळी केंद्र सरकारने एक रुपया आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ११ लाख रुपयांचे दान केले आहे.
देशातील मोठ्या उद्योगपतींकडून विश्वस्त संस्थेने अद्याप दान स्वीकारलेले नाही. तसेच परदेशी भाविकांकडूनही राममंदिर निर्माणासाठी दान देण्यात आले नाही. परदेशातून दान स्वीकारण्यासाठी एफसीआरएची वैधता असणे आवश्यक असून, ती अद्याप झालेली नाही. सध्या आवश्यकता नसल्याने विश्वस्त संस्थेने अद्याप उद्योजकांना दान करण्याचे आवाहन केलेले नाही. तसेच परदेशातून निधी मिळण्यासाठी एफसीआरए असणे आवश्यक आहे. त्यासाठी तीन वर्षांचा लेखापरीक्षणाचा अहवाल अनिवार्य आहे. विश्वस्त संस्था स्थापन होऊन अद्याप तीन वर्ष झालेले नाहीत.
१५ हजार भाविकांकडून ऑनलाइन दान
ऑनलाइन माध्यमातून भाविक मोठ्या प्रमाणात निधी देत आहेत. एप्रिलमध्ये विश्वस्त संस्थेचे खाते उघडल्यानंतर आतापर्यंत जवळपास १५ हजार भाविकांनी ऑनलाइन दान केले आहे. रामभक्तांकडून नेटबँकिंग आणि आरटीजीएस प्रणालीचा वापर करत आहेत. विश्वस्त संस्थेने स्टेट बँक, बँक ऑफ बरोदा, पंजाब नॅशनल बँक या बँकांमध्ये खाते उघडले आहे. या खात्यांमध्ये दररोज लाखोंचे दान येत आहे.
तीन पट दान
राममंदिराचे बांधकाम सुरू झाल्यानंतर रामलल्लाच्या दानामध्ये तीन पटीने वाढ झाली आहे. रामंदिराच्या बाजूने निर्णय येण्यापूर्वी एका महिन्याला दहा ते बारा लाखांचे दान मिळत होते. राममंदिराचा मार्ग मोकळा झाल्यानंतर दानामध्ये वाढ होऊन ते २५ ते ३० लाख रुपये प्रतिमहिना असे झाले आहे. ऑगस्टमध्ये रामलल्लाच्या दानपेटीत पंधरा दिवसात ३५ लाख रुपयांचे दान मिळाले. सप्टेंबरमध्ये एक नवा विक्रम झाला. दानामध्ये दोन पटीने वाढ होऊन ते ७६ लाख रुपयांपर्यंत पोहोचले. ऑक्टोबरमध्ये ८२ लाख रुपयांचे दान मिळाले आहे.