मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी आजचा दिवस विशेष लक्षात राहणारा आहे. कारण आजपासून मोठ्या कंपन्यांच्या एक नव्हे दोन नव्हे तब्बल १७ कार कायमस्वरुपी बंद होणार आहेत. अर्थात या कारचे प्रॉडक्शन यापुढे होणार नाही. त्यामुळे ग्राहकांसाठी यापैकी एखादी कार फेव्हरेट असेल तर त्यांच्या पदरी निराशा येणार आहे.
ज्या मोठ्या कंपन्यांनी आपल्या ठराविक कार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, त्या कंपन्यांच्या गाड्याच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धावताना दिसतात, हे विशेष. आणि यातील बहुतांश डिझेल कार असल्यामुळे तर ग्राहकांची मोठी निराशा होणार आहे. या कंपन्यांमध्ये होंडा, महिंद्रा, ह्युंदाई, स्कोडा, रेनॉ. निसान, मारुती सुझुकी, टोयोटा आणि टाटा यांचा समावेश आहे.
वाहनांच्या आरडीईनुसार बीएस-६ फेज-२ चे नियम १ एप्रिलपासून लागू होणार आहेत. अश्या परिस्थितीत या वाहनांना आरडीई मानदंडाची पूर्तता करणे कठीण होईल आणि कार कंपन्यांना वाहनांची विक्री थांबवावी लागेल. केंद्र सरकारने कठोर नियमांची अंमलबजावणी केल्यामुळे ह्युंदाईला आपल्या आय-२० कारचे डिझेल मॉडेल आधीच बंद करावे लागले आहे. यापूर्वी टोयोटा आणि फोक्सवॅगननेही त्यांच्या डिझेल कारची निर्मिती बंद करणार असल्याचे म्हटले आहे.
इंजिन अपडेट करावे लागेल
नवीन उत्सर्जन नियमांचे पालन करण्यासाठी वाहनांमधील विद्यमान मॉडेल्सचे इंजन अपडेट करावे लागेल. त्यामुळे वाहनांच्या किंमतीही वाढत आहेत. बीएस ६ इंजिनमुळे तीन वर्षांपूर्वी कारच्या किंमती ५० ते ९० हजाराने तर दुचाकीच्या किंमती ३ ते १० हजारांनी वाढल्या होत्या. तसाच प्रकार आताही होईल आणि त्याचा भुर्दंड ग्राहकांना सोसावा लागणार आहे.
या कार दिसणार नाही
१ एप्रिलपासून होंडाच्या ५, महिंद्राच्या ३, ह्युंदाई आणि स्कोडाच्या प्रत्येकी २ तर रेनॉ, टोयोटा, टाटा, निसान, मारुती सुझुकी यांच्या प्रत्येकी एक कार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आणि याची सुरुवात ह्युंदाई कंपनीने केली असल्याचे सांगितले जाते.
Automobile Big Companies Car Closed New Rules Government