नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने ऑल व्हील डिस्प्ले संकल्पनेतून नाशिक शहरात पहिल्यांदाच ऑटो अँड लॉजीस्टिक एक्स्पोचे आयोजन करण्यात येत आहे. या एक्स्पोच्या अनुषंगाने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार दि.१८ मार्च २०२३ रोजी सकाळी १० वाजता नाशिकच्या महाकवी कालिदास कलामंदिर सभागृहात ‘ऑटो अँड लॉजीस्टिक समिट’चे आयोजन करण्यात आले आहे. या समिट मध्ये नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने ‘सारथी सुविधा केंद्र’ या मॉडेलचे सादरीकरण करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष राजेंद्र फड यांनी दिली आहे.
राजेंद्र फड यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन “ऑल व्हील्स डिस्प्ले” या संकल्पनेखाली भव्य ऑटो अँड लॉजिस्टिक एक्स्पोचे आयोजन नाशिक शहरात करत आहे. सदर एक्स्पोच्या माध्यमातून ट्रान्सपोर्ट क्षेत्रातील सर्व घटकांना एकत्र आणत या क्षेत्रासाठी महत्वाचा घटक असलेल्या चालकांसाठी सर्व सुविधायुक्त रेस्ट रूम (सारथी सुविधा केंद्र) उभारण्याचा संस्थेचा उद्देश आहे. यासाठी प्राथमिक स्वरुपात नाशिकच्या आडगाव ट्रक टर्मिनलचा विकास करण्याचा संस्थेचा मानस आहे. त्यासाठी संस्थेच्या वतीने अद्यावत “सारथी सुविधा केंद्राचे” मॉडेल विकसित करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.
त्यांनी पुढे म्हटले आहे की, एक्स्पोचा मुख्य उद्देश साध्य होण्यासाठी देशाच्या प्रगतीमध्ये महत्वाचे योगदान असलेल्या ट्रान्सपोर्ट क्षेत्रातील सर्व घटकांना समिटच्या माध्यमातून एकत्र आणण्याचा मानस आहे. दळणवळण क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत असल्याने ट्रान्सपोर्ट क्षेत्र अतिशय गतिशील पद्धतीने बदलत आहे. त्यामध्ये ट्रान्सपोर्ट क्षेत्राला असलेल्या नाविन्यपूर्ण संधी व तंत्रज्ञान त्या अनुषंगाने ट्रान्स्पोर्टर व्यावसायिकानी करावयाचे बदल याबाबत साधकबाधक चर्चा करण्यासाठी सदर समीटचे आयोजन करण्यात येत असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या समिटच्या माध्यमातून उद्योजकांना मार्गदर्शन करणार आहे. तसेच यावेळी नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या ‘सारथी सुविधा केंद्राच्या मॉडेल’चे सादरीकरण करण्यात येणार आहे अशी माहिती अध्यक्ष राजेंद्र फड यांनी दिली आहे.
उद्योजकांच्या मागणीनुसार एक्स्पोच्या तारखांमध्ये बदल
उद्योजकांच्या दृष्टीने मार्च एंडची कामे अधिक असल्याने एक्स्पोमध्ये उद्योजकांना सहभागी होण्यास अनेक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे सदर एक्स्पोच्या तारखांमध्ये बदल करण्यात यावा अशी मागणी उद्योजकांकडून करण्यात आली. त्यानुसार १७, १८ व १९ मार्च २०२३ रोजी होणारा ऑटो अँड लॉजिस्टिक एक्स्पो आता मे महिन्यात २५ ते २८ मे २०२३ दरम्यान आता तीन ऐवजी चार दिवस आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली असून उद्योजकांनी आणि नागरिकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
Auto Logistic Summit in Nashik Nitin Gadkari