यवतमाळ (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील जेष्ठ रंगकर्मी, कीर्तनकार आणि लेखक श्री सदानंद देशपांडे यांनी लिहलेल्या ‘मला भावलेली माणसं’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच येथील शिशु विहार मंडळाच्या मायादेवी भालचंद्र सभागृहात संपन्न झाला. प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षस्थानी आयुर्वेदाचार्य वैद्य अविनाश जोशी होते. जेष्ठ समीक्षक आणि संस्कार भारतीचे विदर्भ प्रांत कार्यवाह श्री विवेक कवठेकर, नटश्रेष्ठ अशोक (काका) आष्टीकर, आणि पुस्तकाचे प्रकाशक सुलेखनकार राजेंद्र बिदरकर व्यासपीठावर उपस्थित होते.
“‘मला भावलेली माणसे’ च्या रूपाने समाजाने ज्यांच्या चागंल्या गुणांचं अनुकरण करायला हवं अश्या व्यक्तींच्या चरित्रातील वेचे अगदी साध्या आणि सरळ भाषेत लिहून लेखक श्री सदानंद देशपांडे यांनी नव्या पिढीला मार्गदर्शक असे सर्वांगसुंदर पुस्तक मराठी साहित्याला मिळवून दिले आहे,” असे प्रतिपादन श्री विवेक कवठेकर यांनी केले.
सदानंद देशपांडे यांनी यवतमाळ शहरातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक आणि नाट्यचळवळीत मोलाचे योगदान देणाऱ्या १४ व्यक्तिमत्त्वांची व्यक्तिचित्रे या पुस्तकात रेखाटली आहेत. यात जेष्ठ नाट्य दिग्दर्शक आणि कलावंत स्वर्गीय पद्माकर अंगाइतकर, प्रकाश योजनाकार स्वर्गीय मनोज आंबुलकर, गुरुवर्य स्वर्गीय उमेश वैद्य यांचा समावेश आहे. यवतमाळची नाट्य चळवळ जिवंत ठेवण्यात मोलाचे योगदान देणारे नाट्यकलावंत अशोक आष्टीकर, राजकाका भगत, विनायक निवल, नाट्यक्षेत्राबरोबरच शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात आघाडीवर असलेले दीपकराव आणि माधवी देशपांडे, प्रशांत बनगीनवार, वसंतराव आणि वर्षाताई बेडेकर, श्रीकांत आणि माधुरी तिजारे, तसेच कीर्तन क्षेत्रातील वर्षा दामले यांचा यात समावेश आहे. यांबरोबरच सदानंद देशपांडे यांनी त्यांच्या सुविद्य पत्नी चंदाताई देशपांडे यांचेही व्यक्तिचित्रण केलेले आहे. पुस्तकाला संस्कृत विदुषी स्वर्गीय शैलजा रानडे यांची प्रस्तावना लाभलेली आहे.
यावेळी श्री अशोक आष्टीकर यांनी मनोगत व्यक्त केले. “सोपं लिहणं ही फार कठीण गोष्ट आहे. साध्या सोप्या आणि संवादी शैलीमध्ये सदानंद देशपांडे यांनी ज्या व्यक्तींचा परिचय करून दिलेला आहे त्याच्या माध्यमातून आपापल्या क्षेत्रात सातत्याने कार्य करणाऱ्या या व्यक्तिमत्त्वांना एक प्रकारे अजरामर केले आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना श्री सदानंद देशपांडे यांनी कोरोनाच्या लॉकडाऊनच्या कालखंडात या पुस्तकाला मूर्त रूप दिल्याचे सांगितले. “ज्या व्यक्तींच्या बद्दल पुस्तकात लेखन केले आहे त्यांच्याबद्दल लिहण्याचे अनेक वर्षांपासून मनात होते मात्र कोरोनाच्या कालखंडात ते प्रत्यक्षात कागदावर उतरवता आले. पुस्तक प्रकाशनाचं प्रत्येक लेखकाचं स्वप्न असतं ते या निमित्ताने पूर्ण करता आलं,” असे हे म्हणाले. राजेंद्र बिदरकर यांनी पुस्तक तयार होतानाची पार्श्वभूमी त्यांच्या खुमासदार शैलीत कथन केली. वैद्य अविनाश जोशी यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात लेखक आणि लेखकाने वर्णन केलेल्या व्यक्तींशी असलेल्या त्यांच्या ऋणानुबंधाबद्दल भावपूर्ण असे भाष्य केले.
कार्यक्रमाला यवतमाळ शहरातील जेष्ठ रंगकर्मी, साहित्यिक, साहित्य आणि नाट्य रसिक आणि प्रतिष्टीत नागरिक उपस्थित होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनानंतर चैतन्य देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. स्वर्गीय शैलजा रानडे यांनी लिहलेल्या प्रस्तावनेचे वाचन सौ. नुपूर देशपांडे यांनी केले. कार्यक्रमाचे संचलन श्री जयंत चावरे यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. संपदा देशपांडे यांनी केले. देवव्रत देशपांडे यांनी म्हटलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
Author Sadanand Deshpande Book Mala Bhavleli Manase Inauguration