सिल्लोड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटात सर्वांनी बोगस पाहिला .परंतु प्रत्यक्षात एक मुन्नाभाई प्रकारचा म्हणजे बोगस डॉक्टर छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात आढळून आला विशेष म्हणजे या बोगस डॉक्टरांनी लाखो रुपयांचे वेतन सुद्धा घेतले आहे आता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने आरोग्य खात्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे
सिल्लोड तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, बोगस बीएएमएस पदवीधारक तरुण२०१९ पासून जिल्हा परिषदेत कंत्राटी म्हणून वैद्यकीय अधिकारी पदावर नोकरी करीत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने आरोग्य विभागात खळबळ उडाली असून, या प्रकरणी बोगस डॉक्टराच्या विरोधात सिटी चौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहसीन खान शेरखान पठाण (रा. सिल्लोड) असे बोगस डॉक्टरचे नाव आहे. तर मोहसीन खान शेरखान पठाण हा ५ वर्षांपासून कंत्राटी पद्धतीवर सुरवातीला आमठाणा (ता. सिल्लोड) येथे कार्यरत होता. त्यानंतर त्याने २०२२ मध्ये ११ महिन्यांच्या कंत्राटी पद्धतीवर वैद्यकीय अधिकारी पदासाठी मुलाखत दिली आणि त्याची निवडही झाली.
विशेष म्हणजे नंतर अंधारी (ता. सिल्लोड) येथे नियुक्त झाला होता. प्राथमिक आरोग्य केंद्रात कंत्राटी वैद्यकीय अधिकारी नेमण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करून तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक दयानंद मोतीपवळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके यांच्या समितीने उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने त्यातील काही उमेदवारांना ११ महिन्यांची कंत्राटी पदस्थापना दिली होती. त्यात आरोपी मोहसीन खान याचाहाही सहभाग होता. तसेच त्याला अंधारी (ता. सिल्लोड) येथे नेमणूक मिळाली होती.
पंचायत समितीच्या तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेकडे मोहसीन खानच्या बोगस पदवीची तक्रार केली होती, मात्र त्यावेळी कोणतेही कारवाई झाली नव्हती. पुढे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी त्याच्या या बोगस पदवी प्रमाणपत्राबाबत भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोग, नवी दिल्ली व महाराष्ट्र कॉन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन यांच्याकडे पत्रव्यवहार, ईमेलद्वारे संपर्क केला असता, मोहसीन खान पठाण या नावाच्या कोणत्याही व्यक्तीने गेल्या १० वर्षाच्या या कालावधीत साई आयुर्वेदिक महाविद्यालय, अलिगड येथून बीएएमएस पदवी प्राप्त केली नसल्याचे कळविले.
तसेच, महाराष्ट्र कॉन्सिल ऑफ इंडियन मेडिसीनचे प्रबंधक यांनीही नोंदवहीत मोहसीन हे नोंदणीकृत नसल्याचे पत्राद्वारे जिल्हा परिषदेला कळविले. त्यानंतर मोहसीन खान यांचा कारनामा उघड झाला. दरम्यान या सर्व प्रकारावर संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे या प्रकाराची गंभीर दखल घेत कारवाई करण्याचे कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच प्रशासनाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अशाप्रकारे आणखी अनेक बोगस डॉक्टर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातच नव्हे तर मराठवाड्यात आणि अन्यत्र देखील असतील अशी चर्चा सुरू झाली आहे.
Aurangabad Sillod Munnabhai MBBS Bogus Doctor