औरंगाबाद (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यभरात आज सर्वाधिक चर्चेची बाब ठरत आहे ती म्हणजे औरंगाबादचे खड्डे. तसे पाहिले तर राज्यात केवळ औरंगाबादलाच खड्डे नाहीत. जवळपास सर्वच शहरात आहेत. तरीही औरंगाबादची सर्वाधिक चर्चा होत आहे. त्याचे कारण आहे. चिनी कंपनी. या कंपनीने औरंगाबादचे खड्डे तयार केले नाहीत किंवा खड्डे बुजविण्याचेही काम केलेले नाही. विषय अतिशय गंभीर आहे. तो म्हणजे, औरंगाबादला तब्बल ५ मंत्री असले, अत्याधुनिक स्मार्ट एमआयडीसी असली तरी एक मोठी घटना घडली आहे. ती म्हणजे, चिनी कंपनीने येथे गुंतवणुकीस अनुकुलता दाखवली पण एमआयडीसीकडे जाणारे रस्त्यांची पार वाट लागलेली पाहून या कंपनीने आता गुंतवणुकीस नकार दिला आहे.
संपूर्ण मराठवाड्याची राजधानी अशी कायमच घट्ट ओळख टिकवून ठेवणारे आणि आशिया खंडातील सर्वाधिक वेगाने वाढणारं शहर म्हणून औरंगाबादची ओळख आहे. त्यातच आता औरंगाबादमध्ये नव्याने उभी राहत असलेल्या ऑरिक सिटीमुळे हे शहर जागतिक चर्चेत आले आहे. पण शहराच्या याच वेगाने होणाऱ्या विकासात रस्त्यांवरील खड्ड्यांनी मात्र खोडा घातला आहे. धक्कादायक म्हणजे औरंगाबादच्या बिडकीन येथे जागा पाहण्यासाठी आलेले चिनी उद्योगांचे पथक हे पैठण रस्त्यांवरील खड्डे पाहून अर्ध्या रस्त्यातून माघारी फिरल्यामुळे औरंगाबादची मोठी नाचक्की झाली आहे.
औरंगाबाद हे महाराष्ट्र राज्यातील एक मध्यवर्ती व महत्त्वाचे शहर असून औद्यौगिक केंद्र व ऐतिहासिक पर्यटन केंद्र आहे. ते मराठवाडा विभागाचे मुख्यालय आहे. औरंगाबाद हे नाव औरंगजेब या मुघल सम्राटाच्या नावावरून ठेवले गेले आहे, शहराचे जुने नाव खडकी होते. हे शहर संभाजीनगर नावानेही ओळखले जात आहे. औरंगाबादला ५२ दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते. आजही जुन्या औरंगाबाद शहरात अशी अनेक महाद्वारे अर्थात दरवाजे आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ औरंगाबादेत आहे. औरंगाबाद हे जगातले एक सर्वाधिक वेगाने वाढणारे औद्यौगिक शहर आहे. तसेच हे मराठवाड्याच्या व त्यासोबतच महाराष्ट्र पर्यटनाच्या राजधानीचे शहर आहे.
दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर अंतर्गत ऑरिक सिटी उभारण्यासाठी एकूण १० हजार एकर जमीन अधिग्रहित करण्यात आली आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात शेंद्रा आणि बिडकीनमध्ये उद्योग विकासाचे नियोजन करण्यात आले. विशेष म्हणजे शेंद्रा येथील दोन हजार एकरपैकी आतापर्यंत जवळपास ९७ टक्के जागांचे वाटप झाले आहे. त्यामुळे आगामी काळात सर्वच उद्योगांना बिडकीनमध्ये जागा देण्याचे नियोजन आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी चीनमधील एक कंपनीचे पथक गुंतवणुकीसाठी औरंगाबादमध्ये आले होते. हे पथक बिडकीन येथे जागा पाहण्यासाठी पैठण रस्त्यावरून बिडकीन येथे जाणार होते. मात्र औरंगाबाद शहरातून पैठण रस्त्यावरून बिडकीन येथे जाण्यासाठी पथक निघाले असताना रस्त्यात वाहतुकीची कोंडी, रस्त्याची अवस्था पाहून जमीन न पाहताच बिडकीन येण्यापूर्वीच त्यांनी माघारी जाण्याचा निर्णय घेतला.
औरंगाबाद-पैठण रस्त्याच्या चौपदरीकरणाचा मुद्दा अनेक वर्षांपासून गाजत आहे. आतापर्यंत अनेकदा उद्घाटने झाली पण प्रत्यक्षात कामाला सुरवात झाली नाही. विशेष म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यात दोन केंद्रीय आणि राज्यातील सरकारमधील तीन कॅबिनेट मंत्री आहेत. मात्र असे असतांना शहरातील आणि ग्रामीण भागातील रस्त्यांचा प्रश्न काही मार्गी लागतांना दिसत नाही. औरंगाबाद-पैठण रस्ता केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांच्या मतदारसंघातील असूनही, रस्त्यांवरील खड्डे आणि चौपदरीकरणाचा मुद्दा कायम आहे.
शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ ज्या कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यातील 3 मंत्रीपद एकट्या औरंगाबादच्या वाट्याला आले आहेत. ज्यात पैठण विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदिपान भुमरे, सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार आणि औरंगाबाद पूर्वचे आमदार अतुल सावे यांचा समावेश आहे. दुसरीकडे, औरंगाबादला दोन केंद्रीय मंत्रीपदा सुद्धा लाभले आहेत. डॉ. भागवत कराड हे केंद्रीय अर्थराज्यमंत्री आणि रावसाहेब दानवे हे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आहेत. त्यामुळे एकट्या औरंगाबादचे पाच मंत्री आहेत. तर, विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी औरंगाबादचेच अंबादास दानवे आहेत. विरोधी पक्षनेत्यालाही राज्य मंत्र्याचाच दर्जा असतो. म्हणजे जिल्ह्यात तब्बल ६ मंत्री असताना येथील रस्त्यांची पार वाट लागली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणपती विसर्जनानंतर म्हणजेच 12 सप्टेंबरला औरंगाबादच्या दौऱ्यावर येणार आहे. यावेळी त्यांची पैठणला जाहीर सभा होणार आहे. यासाठी त्यांना औरंगाबाद-पैठण महामार्गावरून जावे लागणार आहे. त्यामुळे किमान या दौऱ्यानिमित्ताने तरी या रस्त्याची अवस्था त्यांना कळेल अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामाचे दुसऱ्यांदा उद्घाटन केले होते. मात्र प्रत्यक्षात कामाला कधी सुरवात होणार असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
औरंगाबाद येथील डीएमआयसी, ऑरिक सिटीमुळे (औरंगाबाद इंडस्ट्रिअल सिटी) शेंद्रा-बिडकीनचे रूप बदलले आहे. देशातील सर्वांत वेगाने प्रगती झालेला हा भाग आहे. येत्या चार ते पाच वर्षांत हे चित्र आमूलाग्र बदलणार आहे. शेंद्रा-बिडकीन हा भाग आता महामार्गाशी जोडण्यात येणार आहे. सध्या शेंद्रा परिसरात ७३ उद्योग आले. भविष्यात बिडकीन परिसराचाही विकास होईल. या भागात आम्ही गृह प्रकल्प, रुग्णालये असे प्रकल्पही साकारणार आहेत, तसेच डीएमआयसीमुळे अनेक उद्योग या शहरात येणार आहेत. आता पुन्हा हा वाद सुरू झाल्यानंतर ते उद्योग शहरात गुंतवणूक करतील का? मुख्य म्हणजे राजकीय व्यक्तींनी शहरातील रस्ते पाणी वीज हे मूलभूत प्रश्न सोडविण्याची गरज आहे शहराच्या विकासासाठी किंवा महत्त्वाच्या मागणीसाठी सर्व पक्षांनी मतभेद विसरून एकत्रित येणे ही काळाजी गरज आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
Aurangabad Road Potholes MIDC Chines Company Reject Investment