नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मदतीचा बहाणा करीत भामट्याने एटीएम कार्डची आदलाबदल करीत तरूणाचे ४० हजार रूपये लांबविले. ही घटना महामार्गा वरील जत्रा हॉटेल परिसरात घडली असून याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत रविदास आहेर (३१ रा.स्वामी समर्थ नगर,आडगाव शिवार ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
आहेर गेल्या सोमवारी (दि.२६) पैसे काढण्यासाठी जत्रा हॉटेल भागात गेले होते. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम बुथमध्ये ही घटना घडली. पैसे काढत असतांना पाठीमागे उभ्या असलेल्या भामट्यांने त्यास पैसे काढण्यासाठी मदत केली. यावेळी भामट्याने आहेर यांच्या हातातील एटीएम कार्डची हातचलाखीने आदलाबदल करून ही फसवणुक केली.
आहेर घरी पोहचले असता त्यांच्या मोबाईलवर पैसे काढण्यात आल्याचा संदेश प्राप्त झाल्याने ही घटना उघडकीस आली. भामट्याने लांबविलेल्या एटीएम कार्डच्या माध्यमातून परस्पर बँक खात्यातील ४० हजाराच्या रकमेवर डल्ला मारला. बँक चौकशीनंतर आहेर यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास हवालदार देवरे करीत आहेत.
……