मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विधिमंडळ सभागृहाची खडाजंगीसाठी आणि आरोप-प्रत्यारोपांसाठी जेवढी चर्चा होते तेवढीच चर्चा गमतीदार प्रसंगांसाठीही होते. असे प्रसंग क्वचित येतात, पण ते एवढे खास असतात की त्यावरून काही क्षण का होईना खेळीमेळीचं वातावरण निर्माण होतं. आदित्य ठाकरेंच्या लग्नावरूनही आज तशीच काहीशी गमतीदार चर्चा रंगली.
विधानसभेत विविध विषय चर्चेला येत असताना आमदार बच्चू कडू यांनी कामगारांच्या लग्नाच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘आदित्य ठाकरेंकडे बघून हा प्रश्न विचारला का?’ अशी मिश्किली केली. त्यामुळे सभागृहात जोरदार हशा पिकला. आणि तसं असेल तर राज्य सरकार त्याची जबाबदारी घ्यायला तयार आहे, असेही फडणवीस म्हणाले. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनाही हसू आवरले नाही आणि त्यांनी ‘आधी लग्न लावून देऊ तरच इथे बसता येईल, ही राजकीय धमकी तर नाही ना?’ असा गमतीदार प्रश्न फडणविसांना केला. तरीही विषय एवढ्यावर थांबला नाही.
फडणवीस यांनी लगेच लग्नाच्या बाबतीत आणखी एक मिश्किली केली. ‘एखाद्याच्या तोंडाला कुलुप लावायचे असेल तर त्यावर लग्न हाच उत्तम उपाय आहे. आणि मी हे अनुभवातून बोलतोय,’ असे फडणवीस म्हणाले. त्यानंतर सभागृहात बराच वेळ हास्यकल्लोळ सुरू होता. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही या चर्चेत उडी घेतली आणि ‘आदित्यजी आधी लगीन कोंढाण्याचं’ असा गमतीदार सल्ला दिला.
तर राऊत यांनी राजीनामा द्यावा…
संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी दादा भुसे उभे झाले. त्यांनी राऊत यांचे ट्विट वाचून दाखवले. आम्हाला गद्दार म्हणणारे महागद्दार माझ्यावर ट्विटद्वारे टिका करतात. तथ्य असेल तर कारवाई करावी नाहीतर त्यांनी राजीनामा द्यावा, असे भुसे म्हणाले.
अजित पवार का संतापले?
भुसे यांनी संजय राऊत यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून विरोधीपक्षनेते अजित पवार संतापले. भुसे म्हणाले की, ‘राऊत ये मातोश्रीची भाकरी खातात आणि शरद पवार यांची चाकरी करतात.’ त्यावर अजित पवार यांनी आक्षेप घेतला. ‘काय बोलायचं ते बोला, पण पवार साहेबांचा उल्लेख नको होता. मोदी साहेब पवार साहेबांबद्दल काय बोलतात, हे सर्वांना माहिती आहे. तुम्ही माफी मागायला हवी,’ असे अजितदादा म्हणाले.
Assembly Session Politics Aditya Thackeray Marriage Devendra Fadnavis