कोलकाता – २०२१ च्या निवडणुकीतील केंद्रबिंदू असलेल्या सिंगूरमध्ये सकाळी ११ वाजता गृहमंत्री अमित शाह स्थानिक भाजप उमेदवारासोबत जवळपास एक तास रोड शो करून नंतर हेलिकॉप्टरने थेट दोमजूरला पोहोचतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मोठ्या पोस्टरसह एक रथ तयार असतो. जय श्रीराम, जय जय श्रीरामचा जयघोष सुरू असताना ते रथावर स्वार होतात. रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात जमलेल्या गर्दीतून तसेच गच्चीवरून डोकावून पाहणार्या महिला आणि मुलांच्या मधून रथ जवळपास एक-दीड किलोमीटर मार्गक्रमण करतो. उपस्थित युवक हा क्षण आपल्या मोबाईलमध्ये कैद करण्यात व्यग्र असतात.
रोड शो अधिक प्रभावी
मतदारांवर अमित शाह आणि उमेदवार फुलांचा वर्षाव करत असतात. एका बाल्कनीमध्ये उभ्या असलेल्या आजी फुले फेकण्याचा इशारा करतात आणि अमित शाह त्यांच्याकडे कमळाचे फूल फेकतात. ते फूल आजी आपल्या नातीला देतात. जवळपास एका तासादरम्यान शाह शेवटी बोलतात, भारत माता की जय आणि जय श्रीराम…गर्दीमध्ये अचानक उत्साह संचारतो आणि तशा प्रतिक्रियाही उमटू लागतात. अमित शाह स्मितहास्य करत खाली उतरतात. त्यानंतर दोन ठिकाणीही रोड शो करतात आणि दिल्लीला प्रयाण करतात.
जे. पी. नड्डा यांचे एका दिवसात तीन रोड शो
दुसर्या दिवशी स्थानिक भाजपतर्फे विशिष्ट नेत्यांचा कार्यक्रम होतो. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा उत्तर बंगालमध्ये एका दिवसात तीन रोड शो करणार आहे, असे त्यात सांगितले जाते. प्रचारसभा नाही. आता यापुढे मोठ्या नेत्यांच्या प्रचारसभा कमी आणि रोड शो जास्त होतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे. बंगालमधील चौथ्या टप्प्याच्या मतदानासाठीच्या प्रचाराच्या पद्धतीत आता थोडा बदल झाला आहे. ममता बॅनर्जी यांच्या सरकारच्या धोरणांची पोलखोल करण्यासाठी तसेच तुष्टीकरण, भ्रष्टाचारांच्या मुद्दयावरून त्यांना घेरण्यासाठी सुरुवातीच्या दिवसांत प्रचारसभेची गरज होती, असे एका वरिष्ठ नेत्यांनी सांगितले.
रोड शोमुळे वेळ आणि पैशांची बचत
पंतप्रधान मोदी यांच्या प्रचारसभांदरम्यान अमित शाह आणि नड्डा यांचे रोड शो सुरूच राहणार आहेत. परंतु रोड शोलाच प्राधान्य दिले जाणार आहे. लोकांशी थेट संपर्क साधण्याचे हे प्रभावी साधन आहे. यात वेळेसह पैशांचीही बचत होते, असे नेत्यांचे म्हणणे आहे. मोठी प्रचारसभा आयोजित करणे खूप आव्हानात्मक असते. मोठे नेते रोड शोसाठी उतरल्यावर वातावरणनिर्मिती होण्यास मदत होते आणि गल्लोगल्ली रथ फिरल्यामुळे स्थानिक लोकांमध्ये सुरक्षेची भावनासुद्धा निर्माण होते.
स्थानिक नेत्यांचाही रोड शो
रथयात्रा भाजपच्या संस्कृतीशी निगडित आहे. रोड शोचा प्रभावही तेवढाच परिणामकारक असतो. भाजपच्या वरिष्ठ केंद्रीय नेतृत्वाशिवाय ओळख असलेल्या स्थानिक नेत्यांनीसुद्धा रोड शो करावा, असा आग्रह आहे. बंगालची निवडणूक दीर्घकाळ चालणार असल्यामुळे वेळोवेळी प्रचाराच्या पद्धतींमध्ये काही बदल होत जातील, असे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे.