नवी दिल्ली – डी मार्टचे संस्थापक राधाकिशन दमानी यांनी दक्षिण मुंबईतील मलबार हिल या प्रतिष्ठित भागात तब्बल १ हजार १ कोटींचा बंगला खरेदी केला आहे. ३ टक्के स्टॅम्प ड्युटी देऊन ३१ मार्चला त्यांनी रजिस्ट्रेशन केले. गंमत म्हणजे सवलतीनंतरही ३० कोटी एवढी स्टॅम्प ड्युटी भरावी लागली आहे.
दीड एकरवर हा बंगला आहे. तर प्रति चौ.फुटासाठी १.६० लाख एवढे पैसे मोजण्यात आले आहेत. फोर्ब्स इंडियाच्या आकडेवारीनुसार, देशातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत दमानी हे चौथ्या क्रमांकावर आहेत. १.१३ लाख कोटी एवढी त्यांची संपत्ती आहे. शेअर बाजारातील गुंतवणुकीतून जी काही संपत्ती मिळाली ती सगळी त्यांनी १९९० मध्ये रिटेल व्यवसायात घातली. दमानी यांनी २०२० मध्ये सीसीआय प्रोजेक्ट अंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ८.८ एकरची जमीन खरेदी केली होती. यासाठी त्यांना ५०० कोटी खर्च करावे लागले.
यापूर्वीच्या मोठ्या डिल्स
– सीरम इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष सायरस पुनावाला यांनी २०१५ मध्ये ५० हजार चौ.फुटांचे लिंकन हाऊस खरेदी केले. यासाठी त्यांना ७५० कोटी मोजावे लागले.
– कुमार मंगलम बिर्ला यांनी २०१५ मध्ये २५ हजार चौ. फुटांचे जटीया हाऊस ४२५ कोटींमध्ये खरेदी केले.
– भारत सीरम अँड व्हॅक्सिनच्या गौतम दफतरी यांनी २० व्या मजल्यावरील ६ हजार ३६६ चौ. फुटांचे अपार्टमेंट १०१ कोटी देऊन खरेदी केले.
– मोतीलाल ओसवाल परिवाराने देखील मुंबईत १०१ कोटी खर्चून एक घर खरेदी केले.