इंडिया दर्पण ऑनलाई डेस्क – आसाममध्ये भर उन्हाळ्यात पावसाने हाहाकार उडाला आहे. पाऊस, पूर आणि भूस्खलनाच्या घटनांमुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीत एकाचा मृत्यू झाला आहे. आसाममधील २७ जिल्हे आणि तेथे राहणारे ७.१८ लाख नागरिक पूरामुळे प्रभावित झाले आहेत. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या दैनंदिन पूरपरिस्थितीच्या अहवालानुसार, नगांव जिल्ह्यातील कामपूर महसूल क्षेत्रामध्ये एका व्यक्तीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. त्याशिवाय कामपूरमध्ये आणखी दोन जण बेपत्ता आहेत. राज्यात या वर्षी पूर आणि भूस्खलनाच्या घटनांमध्ये दहा जणांचा मृत्यू झाला आहे.
आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माहितीनुसार, पूरामुळे आसाममधील ७,१७,५०० हून अधिक नागरिक प्रभावित झाले आहेत. राज्यातील बजली, बक्सा, बारपेटा, विश्वनाथ, बोगाईगाव, कछार, दरांग, धेमाजी, धुबरी, डिब्रूगढ, दीमा, हसाओ, गोलपारा, हैलाकांडी, होजई, कामरूप, कामरूप मेट्रोपॉलिटन, कार्बी आंगलोंग वेस्ट, करीमगंज, कोकराझार, लखीमपूर, माजुली, मोरीगाव, नागांव, नलबाडी, सोनितपूर आणि उदलगुरी हे जिल्हे पूरामुळे प्रभावित झाले आहेत.
नगांवमध्ये सर्वाधिक ३.३१ लाख नागरिक प्रभावित झाले आहेत. त्यानंतर कछार (१.६ लाख), होजाली (९७,३००) या भागातील नागरिक प्रभावित झाले आहेत. बुधवारपर्यंत राज्यातील २७ जिल्ह्यांमध्ये पूराच्या विद्ध्वंसामुळे ६.६२ लाख लोक प्रभावित झाले होते. सध्या १७९० गाव पाण्याखाली गेले आहेत. पूरग्रस्त भागातील ६३,९७०.६२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये ३५९ मदत शिबिरे आणि वितरण केंद्रे उभारण्यात आली असून, शासकीय अधिकारी यावर देखरेख करत आहेत. या शिबिरांमध्ये ८०,२९८ नागरिकांनी आश्रय घेतला आहे. त्यामध्ये १२,८५५ मुलांचा समावेश आहे.
एका बुलेटिनच्या माहितीनुसार, लष्कर, निमलष्करी दल, एनडीआरएफ, एसडीआरएफ, नागरी प्रशासन, प्रशिक्षित स्वयंसेवक, अग्निशामक दल आणि आपत्कालीन सेवा तसेच स्थानिक नागरिकांनी नावेच्या आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्याने, पूरात फसलेल्या ७,३३४ नागरिकांना बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलविले आहे. प्रशासनाने ७,०७७.५६ क्टिंटल तांदूळ, डाळ आणि मीठ, ६,०२०.९० लिटर मोहरीचे तेल, २,२१८.२८ क्विंटल पशुखाद्य आणि इतर साहित्य वितरित केले आहे.
https://twitter.com/GourabVarma/status/1527487213700669442?s=20&t=G7aILLTaqeQfGI9iQPQ-4g