मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रहार जनशक्ती संघटनेचे संस्थापक व अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांना त्यांच्या रोखठोक विधानांसाठी ओळखलं जातं. बरेचदा तर सरकारमध्ये राहूनही त्यांनी सरकारविरोधी भूमिका घेतली आहे. त्यामुळे त्यांना नेत्यांचा रोष सहन करावा लागतोय. पण हे सारे तात्पूरते असते. आता मात्र त्यांना एक विधान चांगलेच महागात पडणार आहे.
बच्चू कडू हे महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडलेल्या आमदारांपैकी एक आहेत. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. अद्याप ते मंत्रीपदाची आस लावून बसलेले आहेत. मंत्रीमंडळाच्या विस्तारासाठी त्यांनी बरेचदा सरकारला जाहीरपणे विचारणा केली आहे. पण त्यांचे वादग्रस्त विधान थेट आसाम राज्याला अंगावर घेणारे आहे. त्यामुळे आसाम राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्यांच्याकडे तक्रार केली आहे.
विधानसभेत भटक्या कुत्र्यांच्या मुद्यावर बोलताना बच्चू कडू यांनी हे विधान केले होते. ‘महाराष्ट्रातील सर्व भटके कुत्रे आसाममध्ये पाठवा, तिथे त्यांना किंमत आहे. आसाममधील लोक कुत्र्यांचं मांस खातात. आपण जसा बोकड खातो, तसे तिकडचे लोक श्वानाचं मांस खातात,’ असे बच्चू कडू म्हणाले होते.
आसाममध्ये संताप
बच्चू कडू यांच्या विधानानंतर आसाममधील सामान्य नागरिकांनी या वक्तव्याविरोधात नाराजी व्यक्त केली. तसेच या वक्तव्या विरोधात आसामच्या विधानसभेत देखील गोंधळ पहायला मिळाला. हा वाद आता आणखी वाढला असून आसामचे मुख्यमंत्री हिमांतबिश्वा यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहले आहे.
काय आहे पत्रात?
आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. आमदार बच्चू कडू यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यबाबत हेमंत बिस्वा शर्मा यांनी हे पत्र लिहिलं आहे. बच्चू कडू यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन आपलं वक्तव्य मागे घ्यावं आणि माफी मागावी, अशी मागणी आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
संस्कृतीबद्दलचे अज्ञान
या पत्रामध्ये त्यांनी आसामच्या लोकांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे अतीव दुःख झाल्याचे आसामच्या मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटले आहे. ‘बच्चू कडू यांनी आसामच्या संस्कृतीबद्दल आपले अज्ञान दाखवले आहे. त्यामुळे तुम्ही आसामच्या लोकांच्या भावनांचा आदर ठेवाल,’ अशी आशा असल्याचेही त्यांनी या पत्रामध्ये म्हटले आहे.
Assam CM Letter to Eknath Shinde Bacchu Kade Statement