नाशिक – पर्यटनातील धार्मिक पर्यटन हा एक महत्त्वाचा विषय आहे. आपल्या हिंदू संस्कृतीत धार्मिक स्थळांना, मंदिरांना खूप महत्त्व आहे. दरवर्षी अनेक लोक मोठ्या संख्येने आस्थेने धार्मिक स्थळांना भेटी देतात. ऋषी मुनींनी अनेक धार्मिक स्थळं तयार केली आहेत. धार्मिक पर्यटनाच्या माध्यमातून आपली संस्कृती जपणं गरजेचे आहे, असे मत कैलास मानसरोवर आणि चारधाम यात्रेचे तज्ञ अश्विन नेगी यांनी व्यक्त केले.
धार्मिक पर्यटन, त्याची गरज आणि चारधाम यात्रा याविषयी अश्विन नेगी यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून माहिती दिली. बागेश्री पारनेरकर हिने मुलाखत घेतली. पुढे ते म्हणाले, आपल्याकडे धार्मिक स्थळांमध्ये कैलास पर्वत आणि चारधाम यात्रेला खूप महत्त्व आहे. बद्रीनाथ, रामेश्वरम, जगन्नाथपुरी, द्वारका ही चारधाम यात्रेतील चार स्थानं आहेत. हरिद्वार पासून या यात्रेला सुरुवात होते. दिल्ली आणि डेहराडून या दोन्ही ठिकाणहुन जाण्यासाठी सोय आहे. चारधाम यात्रा भारतात असल्याने वीस हजार ते २२ हजारात ती यात्रा होते. तर कैलास पर्वत तिबेटमध्ये येतो त्यामुळे त्याचा खर्च थोडा अधिक आहे. पण धार्मिक स्थळांमध्ये संपूर्ण जगात कैलास मानसरोवरला खूप महत्त्व आहे. त्यामुळे दरवर्षी ४ ते ५ लाख भाविक येतात. कुठल्याही देशातून काठमांडू येथे यावे लागते आणि तिथून पुढे कैलास पर्वताकडे जाण्याची सोय आहे. मे ते सप्टेंबर या काळात कैलास मानसरोवर येथील यात्रा सुरू असते. तर अक्षय तृतीया ते भाऊबीज या काळात चारधाम यात्रा सुरू असते.
सुविधेविषयी बोलताना ते म्हणाले की, पूर्वी हिमालयात राहण्याची, वाहतूक व्यवस्थेची फारशी सुविधा नव्हती. पण आता राहण्यापासून खाण्यापर्यंत अतिशय चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत. सरकारने टॉयलेट, पर्यटकांसाठी शेड्स तसेच मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तरुणांच्या प्रतिसादाविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, पूर्वी ज्येष्ठ नागरिकांची यात्रा म्हणून याकडे पाहिले जायचे. पण गेल्या काही वर्षांपासून तरुण वर्गही चारधाम यात्रेला येतो. मध्यंतरी आलेला केदारनाथ चित्रपट, ट्रेकिंगची ठिकाण यामुळे तरुण वर्गाचा ओढा केदारनाथकडे वाढला आहे.
कोविडच्या परिणामाविषयी बोलताना ते म्हणाले की, कोविड नंतर धार्मिक पर्यटनाचे महत्त्व अधिक वाढले आहे. लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. आपली संस्कृती खूप समृद्ध आहे. आजकाल युट्यूब वर अनेक व्हिडीओ, माहिती उपलब्ध आहे पण प्रत्यक्ष तिथे जाऊन माहिती समजून घेणं, ती जागा अनुभवणं हे महत्त्वाचे आहे. त्यासाठी एकदा तरी धार्मिक पर्यटनाला जावे, चारधाम यात्रा करावी असे मत त्यांनी व्यक्त केले.
अश्विन नेगी – फोन नंबर – 9867322697
संपूर्ण मुलाखत बघा फेस बुक लाईव्ह पेजवर
https://fb.watch/b1Ya5k0mu7/