नाशिक – हद्दपारीची कारवाई केलेली असतांना शहरात वावरणा-या कोयताधारी तडीपार गुंडास पोलीसांनी ठोकल्या बेड्या
नाशिक : गुन्हेगारी कारवायांमुळे हद्दपारीची कारवाई केलेली असतांना शहरात वावरणा-या कोयताधारी तडीपार गुंडास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. छान हॉटेल भागात तो धारदार कोयत्याचा धाक दाखवित दहशत माजवित होता. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फकिरा रमेश बडे (३१ रा.म्हाडा वसाहत,भारतनगर) असे अटक केलेल्या तडीपार गुंडाचे नाव आहे. बडे याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे त्यास शहर पोलीसांनी एक वर्षासाठी शहर आणि जिह्यातून हद्दपार केले आहे. मात्र त्याचा वावर शहरातच असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. पोलीस त्याच्या मागावर असतांना सोमवारी तो छान हॉटेल परिसरात दहशत माजवितांना मिळून आला. संशयीताच्या अंगझडतीत धारदार कोयता मिळून आला असून पोलीस शिपाई आप्पा पानवळ यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस दप्तरी त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार सोनार करीत आहेत.
विवाहीतेने गळफास घेऊन केली आत्महत्या
नाशिक : पाथर्डी फाटा भागातील वासननगर परिरात राहणा-या २५ वर्षीय विवाहीतेने गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर महिलेच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. शिल्पा रूपेश प्रधान (रा.गुरूकृपा बंगला,वासननगर) असे मृत महिलेचे नाव आहे. प्रधान यांनी सोमवारी (दि.७) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात झोळीच्या दोरीच्या सहाय्याने गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यु झाला. ही बाब सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. पती रूपेश प्रधान यांनी दिलेल्या खबरीवरून मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार भोजणे करीत आहेत.