पिंपळगाव बसवंत : वर्षभरापासून देशासह राज्यात कोरोनाचे थैमान सुरु आहे. आजपर्यंत कोरोना काळात आशा स्वयंसेविकाच सेवा देत आहे. त्यामुळे त्यांच्या मानधनात वाढ करण्याबरोबरच विमा कवच देण्याची मागणी कारसूळ (ता. निफाड) येथील ग्रामपंचायत सदस्य देवेंद्र काजळे यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसरी लाटेचे थैमान सुरु आहे. या परिस्थितीत आशा स्वयंसेविक आपला जीव धोक्यात घालून काम करत आहे. यापूर्वी शासनाने निश्चित केलेली ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ यशस्वीपणे राबविली. पण, यात सिंहाचा वाटा आशा कार्यकर्त्या यांचा आहे. कोरोनाचे काम करत असताना आशा कार्यकर्त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी कोणी घ्यायची, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आशा कार्यकर्त्या म्हणून काम करणाऱ्या सर्वाधिक महिला गरिब कुटुंबातील आहे. त्यांची परिस्थिती बघितली तर कोणीही काम करण्यास धजावणार नाही. सरकार अनेकांना पैसे देऊनही कोरोनाच्या भितीने मदत करण्यास कोणीही पुढे येत नाही. पण, आशा कार्यकर्त्या हे काम कुठलीही तक्रार न करता करीत आहे. हे काम करताना त्यांच्या कुटुंबातील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास त्या व्यक्तिवर होणारा हॉस्पिटलचा खर्च करायचा कोणी किंवा त्या कुटुंबातील कर्त्या पुरुषावर दुख:द घटना घडली तर करायचे काय, असा प्रश्न देवेंद्र काजळे यांनी उपस्थित केला आहे.
आशा कार्यकर्तीच्या पतीचे कोरोनाने निधन….
कारसूळ (ता. निफाड) येथील आशा कार्यकर्ती सविता शरद गांगुर्डे यांच्या पतीचे कोरोनाने मृत्यू झाला. या कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याचे दु:ख आहे. पण, या महिलेच्या कुटुंबातील वृद्ध सासू – सासरे, एक छोटा मुलगा यांच्या पालन पोषणाचे काय, असा प्रश्न आता श्रीमती गांगुर्डे यांच्यासमोर आहे. या कुटुंबाला आधार देण्याची मागणी काजळे यांनी केली आहे.
तहसिलदारांकडून उडवाउडवीची उत्तरे…
सरकारने राज्यातील सर्व आशा कार्यकर्त्यांचा संरक्षण विमा उतरविला तर त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींवर चांगल्या रुग्णालयात उपचार करणे शक्य होणार आहे. कारसूळ येथील आशा कार्यकर्ती महिलेला मदत मिळावी, यासाठी सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र काजळे यांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले. परंतु, तहसीलदार शरद घोरपडे यांच्याकडून काजळे यांना उडवाउडवीची उत्तर देत टपाल घेण्यास नकार दिला. ज्या आस्थापनेचा विषय आहे त्यांना निवेदन द्या, असा सल्ला त्यांनी काजळे यांना दिला. त्यामुळे तहसिलदारांच्या या भूमिकेबाबत संताप व्यक्त केला जात असल्याचे काजळे यांनी सांगितले.
तहसिलदारांची तक्रार करणार
आशा कार्यकर्तीच्या मदतीसाठी प्रत्येक विभागातून निवेदन दिले तर सरकारपर्यंत जाईल व या महिलेला मदत होईल, अशी आपली भूमिका आहे. पण, तहसीलदार नेहमीच सामान्य लोकांची कामे करण्यात व न्याय देण्यात कमी पडतात. आपण तहसिलदारांची तक्रार करणार आहोत.
– देवेंद्र काजळे, ग्रामपंचायत सदस्य कारसूळ