मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आर्यन खान क्रूझ प्रकरणाशी संबंधित भ्रष्टाचारप्रकरणी केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय)ने आज मोठी कारवाई केली. मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी)चे माजी प्रादेशिक संचालक समीर वानखेडे आणि अन्य तिघांविरुद्ध सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे.
दोन वर्षांपूर्वी समीर वानखेडेने अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला क्रूझ ड्रग्ज प्रकरणी अटक केली होती. त्यावेळी समीर हा मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये अधिकारी होता. यासोबतच केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने त्याच्या मुंबई, दिल्ली, रांची (झारखंड) आणि कानपूर (उत्तर प्रदेश) येथील २९ ठिकाणी छापे टाकले.
सीबीआय अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपाखाली हा एफआयआर दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आर्यन खानला २ ऑक्टोबर २०२१ रोजी कॉर्डेलिया क्रूझ जहाजावरील कथित ड्रग बस्ट प्रकरणात अटक करण्यात आली होती.
आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अडकवू नये म्हणून आयआरएस अधिकारी वानखेडे आणि इतरांनी २५ कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. एवढेच नाही तर अधिकारी आणि त्याच्या साथीदाराने अॅडव्हान्स म्हणून ५० लाख रुपये घेतल्याची माहिती सीबीआयला मिळाली.
ड्रग्ज-ऑन-क्रूझ प्रकरणात एनसीबीने आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर त्याने आर्यन खानला क्लीन चिट दिली. त्याचवेळी एनसीबीने स्थापन केलेल्या एसआयटीच्या अहवालात समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखालील तपासात त्रुटी राहिल्याचा दावाही करण्यात आला आहे.
Aryan Khan Case NCB Officer Sameer Wankhede Home CBI Raid