नाशिक येथील राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत खळणार तब्बल १७ ग्रँडमास्टर्स
येत्या २७ ते ३० एप्रिल दरम्यान नाशिक रोड येथील कमिश्नर कार्यालयासमोरच्या महा पर्यावरण संशोधन मंडळाच्या कार्यालयात अखिल भारतीय जलद आणि अतिजलद (Rapid and Blitz) बुद्धिबळ स्पर्धा होत आहे. त्या निमित्ताने हा लेख….

लेखक हे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आहेत.
मो. 9422770532
कोणत्याही बुद्धिबळ स्पर्धेचा दर्जा त्यात किती Grand Masters खेळणार यावर ठरतो. जितके जास्त Grand masters तितकी ती स्पर्धा अव्वल मानली जाते. या निकषावर नाशिक येथे २७ एप्रिल पासून सुरु होणारी राष्ट्रीय जलद आणि अतिजलद (Rapid and Blitz) स्पर्धा ही अलीकडील भारतात झालेल्या स्पर्धेतील सर्वात जास्त प्रतिसाद मिळालेली स्पर्धा असेल. कारण जलद स्पर्धेत एकूण १८६ खेळाडू खेळणार आहेत तर अतिजलद स्पर्धेत १७६ बुद्धिबळपटू उतरले आहेत. त्यात थोडेथोडके नव्हे तर चक्क १७ Grand Masters, २४ इंटरनॅशनल मास्टर्स, १४ फिडे मास्टर्सआणि ०३ महिला Grand Masters खेळणार आहेत.
यापूर्वी कोरोना नसतानाही २०१९ साली अहमदाबाद येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत फक्त १३९ खेळाडू होते. त्यात १२च Grand Masters होते ही एकच गोष्ट नाशिक येथे होणाऱ्या स्पर्धेचे मोठेपण आणि महत्त्व अधोरेखित करते. नाशिकमधील स्पर्धेसाठी मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादाची आणखी दोन महत्वाची कारणे आहेत. एक म्हणजे दोन वर्षे कोरोना मुळे समोरासमोर खेळण्याची संधी जी मिळाली नव्हती ती आता मिळाली आहे. तिचा पुरेपूर फायदा घ्यावा असे खेळाडूंना वाटत असावे. दुसरे कारण म्हणजे येत्या (बहुधा) डिसेंबरमध्ये होणाऱ्या विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड या स्पर्धेतील कामगिरीवर होणार आहे.
अर्थात या स्पर्धेत भाग न घेतलेले स्टार खेळाडू जसे विदित गुजराथी, अधिभान, हरिकृश्न, प्रज्ञानानंद, गुकेश, निहाल सरिन, अर्जुन एरिगियासी इ तसेच कोनेरू हंपी, पद्मिनी इ यांची निवड होणारच पण राहिलेल्या थोड्या जागा नाशिक स्पर्धेतील कामगिरीवर भरल्या जातील असे म्हणता येईल. तथापि वरील स्टार खेळाडू मैदानात नसले तरीही नाशिक येथील स्पर्धेत स्टार value असलेले आणि उत्तम खेळणारे भरपूर खेळाडू आहेत.
स्पर्धेत सहभाही होणाऱ्या स्पर्धकांमध्ये मागील राष्ट्रीय स्पर्धेतील विजेता अरविंद सुब्रमण्यम, मुरली कार्तिकेयन, पी कार्तिकेयन, आर आर लक्ष्मण, अर्जुन कल्याण, दीपन चक्रवर्ती आणि विष्णू प्रसन्न (सर्व तामिळनाडू), दिप्तायन घोष आणि मित्राभा गुहा (दोघेही बंगाल), श्रीराम झा (एलआय सी), गोपाल एस, नीलोत्पल दास आणि नितीन एस (सर्व पी एस पी बी) वैभव सुरी (दिल्ली) आणि संकल्प गुप्ता (महाराष्ट्र) आदी रथी, महारथी, Grand मास्टर्स आणि त्यांच्या जोडीला आणि स्पर्धा करायला २४ इंटरनॅशनल मास्टर्स आहेत. त्यात विशेष नाव घेतले पाहिजे असे बुजुर्ग खेळाडू रवि तेजा, रवी हेगडे आणि अनुप देशमुख यांची. कारण हेही स्पर्धेत रंग भरायला तयारीने उतरत आहेत. तर अलिकडेच राष्ट्रीय क्लासिकल स्पर्धा जिंकणारी नागपूरकर दीप्ती देशमुख, गोव्याची भारतीय संघाची महत्वाची खेळाडू भक्ती कुलकर्णी आणि सौम्या सोमनाथन याही भारतीय संघातील आपले स्थान टिकविण्यासाठी किंवा मिळविण्यासाठी उत्सुक आहेत.
नाशिकपुरते बोलायचे तर सुयोग वाघ, वेदान्त पिंपळखरे, बुद्धिबळ खेळात करिअर करण्यासाठी शालेय शिक्षण सोडून देणारा कैवल्य नागरे हे सुद्धा आपले रँकिंग सुधारण्यासाठी आणि अव्वल खेळाडूबरोबर दोन हात करण्यासाठी उतरले आहेत. सुरुवातीला (२७ ते २९ एप्रिल) पहिले तीन दिवस रोज तीन डाव याप्रमाणे नऊ डाव असलेली स्विस लिग पध्दतीची जलद स्पर्धा होईल. ज्यात एक डाव १५ मिनिटांचा असेल आणि शेवटच्या दिवशी (३० एप्रिलला) ११ डावांची अतिजलद स्पर्धा होईल. यात एक डाव पाच मिनिटांचा असेल.
नाशिकमध्ये भारतातील दोन क्रमांकाचा आणि जगातील २३ व्या क्रमांकावर असलेला विदित गुजराती राहत असूनही इतकी मोठी आणि महत्वाची बुद्धिबळ स्पर्धा झाली नव्हती. ती उणीव आता धनंजय बेळे अध्यक्ष असलेल्या आणि विनय बेळे (उपाध्यक्ष), सुनील शर्मा (सेक्रेटरी) आणि इतर उत्साही कार्यकारिणी सदस्य असलेली नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटना राष्ट्रीय स्पर्धा भरवून दूर करीत आहेत. नव्या खेळाडूसाठी आणि बुद्धिबळ वाढण्यास या स्पर्धेचा नक्की फायदा होईल, असे म्हणायला हरकत नाही.