गुरुपौर्णिमा महात्म्य
गुरुर ब्रम्हा गुरुर विष्णू
गुरुर्देवो महेश्वरा
गुरु साक्षात परब्रह्म
तस्मै श्री गुरुवे नमः…
अर्थात गुरूंच्या रूपातच ब्रह्मा-विष्णू-महेश यांचे स्वरूप असते. आषाढ शुक्ल पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमेचा दिवस महर्षि वेदव्यास पौर्णिमा म्हणून देखील गुरुपौर्णिमेचा दिवस ओळखला जातो. या दिनाचे महत्त्व आपण जाणून घेऊ या…
पंडित दिनेश पंत
गुरुपौर्णिमा आपल्या गुरुंप्रती कृतज्ञता व श्रद्धा भाव अर्पण करण्यासाठी साजरा केली जाते. माता व पिता आपले प्रथम गुरु असतात. त्यामुळेच मातृदेवो भव, पितृ देवो भव, आचार्य देवो भव असा उल्लेख शास्त्रात आढळतो. अर्थात आई वडील व गुरु हे देवा समान असतात. श्री दत्तात्रेयांचे चोवीस गुरु. श्रीदत्तात्रेयांनी आपल्या अवतार कार्यात विविध प्रकारच्या दातृत्व गुणांनी युक्त अशा निसर्गातील २४ घटकांना आपल्या गुरुस्थानी मानले होते, असा उल्लेख शास्त्रात आढळतो. गुरु शिष्य परंपरा तसेच गुरुकुल शिक्षण पद्धती याचे महत्व पुराणकाळात आढळते.
गुरुपूजन
आजच्या दिवशी आपले प्रथम गुरु आई-वडिल यांचे आशीर्वाद घ्यावेत. त्यानंतर आपल्या कार्यक्षेत्रात ज्ञानार्जनासाठी आपण मानलेल्या गुरूंच्या प्रतिमेला पुष्पहार घालून वंदन करावे. त्यांनी आपल्याला दिलेल्या “ज्ञानविद्या” चे स्मरण करावे. गुरूंना प्रत्यक्ष भेटणे शक्य असल्यास त्यांची भेट घेऊन आशीर्वाद घ्यावेत. अथवा फोन करून क्षेम कुशल विचारावे. आपल्याला कोणत्याही पद्धतीने ज्ञानरूपी मदत करणाऱ्यांप्रती सदैव आदर, कृतज्ञताभाव ठेवावा. यामध्ये गुरुंचे स्थान सर्वोच्च असावे.
शिष्यपरीक्षा व गुरुकृपा कथा
शिष्यांना गुरु आज्ञा पाळावी लागते. याबाबतीत गुरु शिष्यांच्या संयमाची परीक्षा घेतात. त्यानंतरच गुरु कृपा करतात. याबाबत अनेक पौराणिक कथा प्रसिद्ध आहेत. एकदा एका गुरूंनी आपल्या शिष्याच्या संयमाची परीक्षा बघण्यासाठी त्याला काही दिवस आश्रमाबाहेर राहण्यास सांगितले. तो शिष्य जेवढे दिवस बाहेर होता तेवढे दिवस त्या गावातील सर्व लोकांच्या घरातील लोखंडी वस्तू आश्रमात आणण्यास सांगितले. त्या सर्व लोखंडी वस्तू गुरु सोन्याच्या करून देत असत. ही बातमी आश्रमाबाहेर राहिलेल्या त्या शिष्यापर्यंत पोहोचली. शिष्याला खूप राग आला. मी गुरूंची एवढी सेवा करुन देखील मला गुरूंनी काहीच दिले नाही. परंतु सर्व गाव मात्र सोन्याचे केले. याचा जाब विचारण्यासाठी गुरु आज्ञा नसताना देखील तो शिष्य आश्रमात आला. गुरुंना झाल्या प्रकाराबाबत जाब विचारला. तेव्हा गुरूंनी रागातच शेजारी पडलेला एक दगड त्याच्यावर भिरकावला. त्याला आश्रमातून निघून जाण्यास सांगितले. गुरूंनी अंगावर फेकलेला दगड शिष्याने रागारागात गावाबाहेरील नदीत फेकून दिला. गुरूंवर राग धरून कायमचा आश्रम सोडून निघून गेला. काही दिवसांनी त्या गावातील एक व्यक्ती लोखंडी वस्तू घेऊन या शिष्याला शोधत आला. माझी वस्तू सोन्याची करून दे म्हणून आग्रह धरला. शिष्याने त्याला आपल्या गुरुंच्या आश्रमात जाण्यास सांगितले. तेच हे करू शकतात, असे सांगितले. तेव्हा तो व्यक्ती म्हणाला मी आश्रमात गेलो होतो. परंतु गुरूंनी मला सांगितले ज्या दगडाचा स्पर्श करून मी लोखंडाचे सोने करत होतो, तो दगड मी माझ्या प्रिय शिष्याला फेकून मारला आहे. (अर्थात माझी सर्व विद्या त्याला दिली आहे). तू त्यालाच भेट असे सांगितले आहे. त्याक्षणी गुरूंनी आपल्याला बहुमोल दान दिले होते. ते आपण नदीत फेकून दिले. गुरुंनी आपल्या संयमाची परीक्षा पाहिली, याची जाणीव शिष्याला झाली. अर्थात गुरुकृपा होण्यासाठी स्वभावात संयम अवश्य ठेवावा.
संत कबीर गुरुंप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करताना आपल्या दोह्यात म्हणतात
गुरु बिन ज्ञान न उपजे! गुरु बिन मिले ना मोश!! गुरु बिन लखेन सत्य को! गुरु बिन मिटेना दोष!!
अर्थात गुरु उपदेश झाल्या शिवाय ज्ञान आणि मोक्ष दोन्ही मिळत नाही. गुरु उपदेश झाल्याशिवाय जीवनातील सत्य व आपल्यातील दोष दोन्ही कळत नाहीत.