मुंबई – देश भिकेला लागला की दुसऱ्या देशांकडून कर्ज घेऊन चालविण्याची वेळ येते. त्यातही कर्जबाजारी झाला तर उद्योगांच्या स्वरुपात, पर्यटनाच्या स्वरुपात देशात पैसा कसा येईल यासाठी प्रयत्न केला जातो. मात्र जगातील एका देशाने चक्क सीमेवरील जवानांसाठी असलेले हेलिकॉप्टर लोकांना फिरविण्यासाठी वापरायला घेतले आहेत. जवानांचे हेलिकॉप्टर सवारीसाठी वापरून या देशाने साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.
पश्चिम आशियातील लेबनॉन हा देश जाळपोळ, राष्ट्रीय उठाव, बॉम्बहल्ले यासाठी ओळखला जातो. चारही बाजुंनी उद्धवस्त झालेल्या या देशाची आर्थिक स्थिती खराब झाली आहे. एवढी की त्याचा परिणाम देशाच्या सेनेवरही होऊ लागला आहे. लेबनॉनच्या सैन्याला स्वतःचे खर्च भागविण्यासाठी आपल्या संसाधनांचा वापर करण्याचे सरकारने आदेश दिले आहेत. त्यामुळे सैनिकांसाठी असलेले हेलिकॉप्टर सर्वसामान्य लोकांना फिरविण्यासाठी वापरले जात आहे. यावरून देशाची स्थिती किती वाईट आहे, याचा अंदाज येतो.
जवानांसाठी असलेले हेलिकॉप्टर्स भाड्याने दिले जात आहेत. सर्वसामान्य नागरिकांना १५ मिनीटांमध्ये आकाशातून देश दाखविण्याची ऑफर सैन्याने दिली आहे. त्यामुळे नागिरकही पैसा खर्च करून हौस भागवून घेत आहेत. मेट्रो सुरू होताना जशी जॉयरॉईड दिली जाते, तशी हेलिकॉप्टर जॉयरॉईड लेबनॉनमधील नागरिकांना दिली जात आहे. त्यासाठी लोक पैसाही खर्च करीत आहे.
एका फेरीत ३ नागरिक जाऊ शकतात. प्रत्येकी १५० डॉलर म्हणजे जवळपास साडेअकरा हजार रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून वायुसेनेचे प्रोत्साहन वाढविण्याचा प्रयत्न होत आहे, असे सरकारचे म्हणणे आहे. तर पर्यटनाचेही एक नवे माध्यम सापडल्याचे सैन्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. आर्थिक संकटामुळे देखभाल दुरुस्ती व उपकरणांसाठी सेनेच्या बजेटला सरकारने कात्री लावली आहे.
बॉम्बस्फोटानंतर बिघडले
गेल्यावर्षी आगस्टमध्ये एक मोठा बॉम्बस्फोट झाला होता. तेव्हापासून लेबनॉनमध्ये कामकाजी सरकार नाही. या स्फोटात २०० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. यातून मोठी वाताहत देशात झाली. जगाच्या गेल्या १५० वर्षांत लेबनॉन सर्वांत वाईट स्थितीत आहे, असे जागतिक बँकेने म्हटले आहे. याशिवाय आर्थिक संकटामुळे देशात जागोजागी आंदोलने, दंगली होत आहेत.