विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
ऑनलाइन व्यवहाराबाबत अज्ञानाचा गैरफायदा घेऊन अनेकांची सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक होत असते. साधारण पन्नाशीच्यावर असलेल्या लोकांकडून बहुतांश फसवणुकीच्या तक्रारी येतात. त्यात निवृत्तिवेतनधारकांचाही समावेश आहे. तुमच्या घरात कोणी निवृत्तिवेतनधारक असतील तर त्यांना त्वरित सतर्क करावे. उत्तर प्रदेश पोलिसांनी तसा अलर्ट जारी केला आहे, सायबर गुन्हेगारांनी निवृत्तिवेतनधारकांची फसवणूक करण्याच्या नव्या पद्धती शोधून काढल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
कसे ओढतात जाळ्यात
सायबर गुन्हेगार इतके चलाख असतात की ते निवृत्तिवेतनधारकांची सर्व माहिती घेऊन ठेवतात आणि निवृत्तिवेतनधारकांना फोन करून डिजिटल हयातनामा बनवण्याची बतावणी करतात.
फसवणुकीची पद्धत
सायबर गुन्हेगार निवृत्तिवेतनधारकांकडून देयकाच्या रकमेची संख्या (PPO), आधारकार्ड संख्या, राहण्याचा पत्ता, ईमेल आयडी, निवृत्तिवेतनानंतर मिळालेली रक्कम, मासिक निवृत्तिवेतन, नामनिर्देशित व्यक्ती आदीबाबत माहिती सांगतात. त्यामुळे सायबर गुन्हेगार कोषागार (ट्रेजरी) किंवा निवृत्तिवेतन संचालनालयातून बोलत असल्याचे निवृत्तिवेतनधारकांना पटते.
ओटीपीचा खेळ
पोलिसांच्या माहितीनुसार, सायबर गुन्हेगारांनी निवृत्ती वेतनधारकांचा विश्वास संपादन केल्यानंतर डिजिटल हयातनामा अपडेट करण्यास सांगतात. त्यांच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल असे सांगतात. त्यानंतर ते ओटीपी मागून निवृत्तिवेतनधारकांचे बँक खातेच ताब्यात घेतात.ओटीपी मिळाल्यानंतर सायबर गुन्हेगार बँक खाते साफ करून टाकतात. खात्यातील रक्कम दुसर्या बनावट खात्यात किंवा मोबाईल वॉलेटमध्ये स्थलांतरित करतात.
कशी करावी सुटका
निवृत्तिवेतन संचालनालयाने याबाबत संबंधितांना सतर्क केले आहे. निवृत्तिवेतनधारकांना हयातनामा डिजिटल करण्यासाठी निवृत्तिवेतन संचालनालय कधीही फोन करत नाही. किंवा ऑनलाइनही अपडेट करत नाही, अशी माहिती संचालनालयाकडून देण्यात आली आहे. आपला हयातनामा स्वतः येऊन विभागात सुपूर्द करावा, हे निवृत्तिवेतनधारकांचे कर्तव्य आहे. तसेच अशा फसवणूक करणार्या कॉलपासून सावध राहावे. असे घडलेच तर तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.