मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तुमच्याजवळ पेटीएम (Paytm) चे शेअर्स असतील, तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे वृत्त आहे. कारण, गेल्या काही महिन्यांपासून तुम्हाला ही आस लागून आहे की, हा शेअर आणखी वर जाईल आणि तुमची गुंतवणूक फलदायी ठरेल. पण, तूर्त तरी तुमचा भ्रमनिरास होणार आहे. कारण, आताची बातनी ही तुमच्यासाठी वाईटच आहे.
मॅक्वायरी या परदेशी ब्रोकरेज हाउसने पेटीएमच्या शेअर्सच्या स्टॉकची किंमत घटवली आहे. मॅक्वायरीने पेटीएमच्या शेअर्सचा टार्गेट प्राइज घटवून ९०० रुपये केला आहे. यापूर्वी मॅक्वायरीने पेटीएमच्या शेअर्सचा टार्गेट प्राइज १२०० रुपये दिला होता. One97 कम्युनिकेशन्स ही पेटीएमची मूळ कंपनी आहे. ब्रोकरेज हाउसच्या म्हणण्यानुसार व्यापारी कर्जासाठी वितरण व्यापार वाढवण्याच्या शक्यता खूपच मर्यादित आहेत. ही माहिती इकॉनॉमिक टाइम्सच्या एका वृत्तात देण्यात आली आहे.
मुंबई शेअर बाजारात सध्या पेटीएमचे शेअर्स ५ टक्क्यांहून अधिक घटून ११६९.२० रुपयांच्या पातळीवर व्यवसाय करत आहे. मॅक्वायरीने पेटीएमच्या स्टॉकसाठी जो नवा टार्गेट प्राइज (९०० रुपये) दिला आहे, तो त्याच्या २१५० रुपयांच्या इश्यू प्राइजहून ५८ टक्के खाली आला आहे. सध्याच्या स्टॉक प्राइजमधून नवा टार्गेट प्राइज २० टक्क्यांहून खाली आहे.
मॅक्वायरीने २०२१-२६ या आर्थिक वर्षांसाठी पेटीएमच्या रेव्हेन्यू ग्रोथ रेटचा अंदाजही २६ टक्क्यांनी घटवून २३ टक्के केला आहे. लोअर रेव्हेन्यू आणि हायर एम्प्लॉइज, सॉफ्टवेअर-क्लाउड एक्सपेंसेंसमुळे कंपनीचे प्रति शेअर नुकसानही १६-२७ टक्के वाढविण्यात आले आहे.
मॅक्वायरीच्या अधिकार्यांनी सांगितले, की पेटीएमच्या पेमेंट बिझनेसच्या अजूनही एकूण ग्रॉस रेव्हेन्यूमध्ये ७० टक्क्यांची भागिदारी आहे. त्यामुळे चार्जेस कॅप करण्याशी संबंधित कोणतेही नियमन त्याच्या रेव्हेन्यूवर थेट परिणाम करू शकतो. आयआरडीएआयने पेटीएमचा विमा क्षेत्रात प्रवेश फेटाळला आहे. तसेच पेटीएममधील वरिष्ठ कार्यकारी अधिकार्यांनी नोकरी सोडण्याकडेही जोखीम म्हणून पाहिले जात आहे. १८ नोव्हेंबरनंतर पेटीएमच्या शेअर्समध्ये ४० टक्क्यांहून अधिकची घसरण झाली आहे.