पुणे – या वर्षी सणासुदीच्या दिवसांत 5G स्मार्टफोनची मोठी मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळेच स्मार्टफोन कंपन्या नव्या 5G स्मार्टफोनचे अनावरण करत आहेत. तुम्हालासुद्धा सणासुदींच्या दिवसात 5G स्मार्टफोन घेण्याची इच्छा असेल, तर त्यासंदर्भातील काही गोष्टी ठाऊक असणे आवश्यक आहे. फक्त 5G फोन पाहून तो खरेदी करू नये.
5G फोन किती वेगवान
सध्याच्या परिस्थितीत 4G फोनच्या तुलनेत 5G स्मार्टफोनची किंमत अधिक आहे. त्यामुळे तो 4G फोनच्या तुलनेत वेगवान आहे की नाही हे तुम्हाला पाहावे लागेल. सामान्यतः 5G फोनची किंमत 4G फोनपेक्षा दुप्पट असते. तसेच 5G नेटवर्कचा वापर करण्यासाठी महाग रिचार्ज करण्याची आवश्यकता असते. त्यामुळे फक्त 5G फोन आहे म्हणून खरेदी करावाच असे काही नाही.
फोनमध्ये किती बँड्स
भारतात 5G नेटवर्क पूर्णपणे सुरू होण्यास वेळ लागणार आहे. ही गोष्ट स्मार्टफोन कंपन्यांनाही ठाऊक आहे. हे पाहूनच काही कंपन्या भविष्यात अजिबात उपयोगी नसलेल्या सिंगल बँडचे 5G स्मार्टफोन सादर करत आहेत. त्यामुळे सिंगल बँडच्या 5G स्मार्टफोनमध्ये 4G सारखाच वेग मिळू शकतो. त्यामुळे जास्त बँड्सना सपोर्ट करणारा 5G फोनच घ्यावा.
कोणते बँड्स अधिक कव्हरेज देणारे
mmWave रेडिओ फ्रिक्वेन्सी असलेल्या 5G स्मार्टफोनवर जास्त पैसे खर्च करणे शहाणपणाचे ठरणार नाही. Sub-6Ghz 5G फ्रिक्वेन्सी सपोर्ट असलेला स्मार्टफोन खरेदी करणे जास्त योग्य ठरेल. या नेटवर्कमध्ये जास्त कव्हरेज एरिया मिळेल. त्यांना मिड-रेंज बँड असे म्हणतात. या बँड्सच्या कव्हेजमध्ये सर्व प्रकारचे फोन चालतात.
5G फोनच्या बॅटरीचे आयुष्य
5G स्मार्टफोनमध्ये 4G स्मार्टफोनची बॅटरीच्या तुलनेत गरम होण्याची तसेच लवकर डिस्चार्ज होण्याची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे 5G फोन घेताना बॅटरीच्या आयुष्याची संपूर्ण माहिती घेऊनच फोन खरेदी करावा. 5G तंत्रज्ञानामध्ये डाटा रिसिव्हिंगदरम्यान अधिक बॅटरी खर्च होते. त्यामुळे मोठ्या बॅटरीचे 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा चांगला पर्याय आहे. 5G स्मार्टफोनमध्ये सिग्नल रिसिव्ह करण्यासाठी ३ अतिरिक्त अँटिना दिले जातात.