नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यभरातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे निकाल घोषित होत आहेत. कुठे प्रस्थापितांना धक्का आहे तर कुठे नवोदितांना संधी. तर काही ठिकाणी आश्चर्यकारक निकाल लागत आहेत. या निकालांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रीया दिली आहे. या निकालांमध्ये महाविकास आघाडीची सरशी झाली आहे की शिंदे गट-भाजप यांना संधी मिळाली आहे. यासंदर्भात भुजबळांनी स्पष्टच सांगितले आहे…
बाजार समिती निवडणूक निकाल
भुजबळ म्हणाले की, राज्यतले जे निकाल पाहत आहे, ते पाहून भाजप आणि शिंदे यांच्या दुप्पट बाजार समित्या महाविकास आघाडीकडे आहेत. राज्याच्या राजकारणाचा सुचक आणि आनंदाचा निकाल आहे. भाजपला काही ठिकाणी एक मत मिळाले आहे पाहतो आहे. नाशि जिल्ह्यात १४ बाजार समितीच्या निवडणुका झाल्या आहेत. नांदगाव, मनमाडचा निकाल उद्या येणार आहे. एकूण १२ ठिकाणी निवडणुका झाल्या आहेत. देवळा भाजपकडे तर एक बाजार समिती माकपकडे गेली आहे. उरलेल्या महाविकास आघाडीकडे आहेच. एकूण चित्र पाहता महाविकास आघाडी फार पुढे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
दादा भुसेंना धोबीपछाड
भुजबळ म्हणाले की, मालेगावात शिंदे गटाचे मंत्री आणि पालकमंत्री दादा भुसे यांच्या नेतृत्वातील पॅनलला शह बसला आहे. महाविकास आघाडीचे १८ पैकी १४ उमेदवार पुढे आहेत. राज्यात अनेक ठिकाणी निकाल लागले आहेत. भाजप आणि शिंदे गट यांना पराभवाला सामोरे जावे लागत आहे. सर्वसामान्य जनता जरी या निवडणुकीत भाग घेत नसली तरी ग्रामपंचायत सदस्य हे गावातील लोक असतात. यानिमित्ताने महाराष्ट्राचा कौल स्पष्ट दिसत आहे. महाविकास आघाडीला दुपटीने निवडून दिले आहे. आहे तशीच मांडणी पक्षांची राहिली तर हा ट्रेंड तसाच पुढच्या निवडणुकमध्ये राहील, असे भुजबळ यांनी सांगितले.
मतदारांना फाईव्ह स्टार सुविधा
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत एका पॅनलने मतदारांना ५ स्टार हॉटेल मध्ये निवास आणि जेवणाची व्यवस्था केली. तसेच, बसमधून त्यांना मतदानासाठी आणण्यात आले. याविषयी भुजबळ म्हणाले की, चांगली गोष्ट आहे. गोरगरिबांनी ५ स्टार हॉटेल अनुभवले. मात्र, ग्रामीण भागातील मतदार सुज्ञ आहेत. ते योग्य व्यक्तींनाच मत देतील, असे भुजबळांनी स्पष्ट केले.
दिग्गजांना फटका
राज्यात अनेक दिग्गजांना फटका बसत असल्याबद्दल भुजबळ म्हणाले की, नाशिक जिल्ह्यात दादा भुसे फार मागे पडताना दिसत आहेत. बीडमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडेंचा पॅनल मागे पडताना दिसत आहे. संध्याकाळी पर्यंत सर्व निकाल बाहेर पडेल चित्र स्पष्ट होईल, असे भुजबळ म्हणाले.
APMC Election Politics NCP Leader Chhagan Bhujbal