मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अनुपमा या टीव्ही शोमधील अभिनेते नितीश पांडे यांचा इगतपुरी तालुक्यातील एका हॉटेलमध्ये संशास्पद मृत्यू झाला आहे. त्यांच्या अचानक झालेल्या या मृत्यूमुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हृदयविकाराने त्यांचे निधन झाल्याचे सांगितले जात आहे. आता यासंदर्भात नाशिक ग्रामीण पोलिसांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
अनुपमा शो हा घराघरात प्रसिद्ध झाला आहे. प्रेक्षकांनाही शोमधील सर्व पात्रांना पाहायला आणि फॉलो करायला आवडते. या शोमध्ये रुपाली गांगुलीची मैत्रिण देविकाच्या पतीची भूमिका करणाऱ्या नितीश पांडे यांचे निधन झाले आहे. हे ऐकून संपूर्ण टीव्ही इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. या बातमीवर कोणाचाही विश्वास बसत नाहीये.
अनुपमा फेम नितीश पांडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. अभिनेत्याचे वय अवघे ५१ वर्षे होते, मात्र या वयातही त्यांना जगाचा निरोप घ्यावा लागला. नितीश पांडे बराच काळ टीव्ही इंडस्ट्रीचा भाग होता आणि अनुपमा या शोमध्ये नियमितपणे दिसले. आता या बातमीमुळे कुटुंबीयच नाही तर चाहतेही शोकसागरात बुडाले आहेत. ही बातमी सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
लेखक सिद्धार्थ नागर यांनी नितीश पांडे यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. लेखकाने फेसबुक पोस्टद्वारे चाहत्यांना याची माहिती दिली आहे. त्यानंतर एका मीडिया हाऊसला दिलेल्या मुलाखतीत सिद्धार्थने याची पुष्टी केली आहे. लेखकाने सांगितले की, नितीश शूटिंगसाठी इगतपुरीला गेले होते. तेथे रात्री दीडच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर ते आमच्यासोबत नसल्याची माहिती मिळाली.
अभिनेता नितीश पांडेने बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. १७ जानेवारी १९७३ रोजी जन्मलेल्या नितीश पांडे यांनी टीव्ही जगतात चांगले नाव कमावले होते. एवढेच नाही तर या अभिनेत्याने बॉलिवूडचा किंग खानसोबत ‘ओम शांती ओम’ चित्रपटातही काम केले आहे. अनुपमा शोमधील नितीशच्या व्यक्तिरेखेलाही प्रेक्षकांनी दाद दिली होती.
नाशिक ग्रामीण पोलिस म्हणाले
अभिनेता नितीश पांडे हे इतगपुरी तालुक्यातील हॉटेल ड्यू ड्रॉप या हॉटेलमध्ये मुक्कामी होते. काल सायंकाळी त्यांनी जेवणाची ऑर्डर दिली. मात्र, बराच वेळ झाला तरी त्यांनी या ऑर्डरबाबत विचारपूस केली नाही. त्यामुळे हॉटेल व्यवस्थापनाला शंका आली. त्यामुळे मास्टर कीच्या माध्यमातून पांडे यांचा रुम उघडण्यात आला. आतमध्ये हे पांडे बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. हॉटेल व्यवस्थापनाने तातडीने रात्री २ वाजेच्या सुमारास पांडे यांना इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा तत्पूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. याप्रकरणी इगतपुरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजू सुर्वे हे अधिक तपास करीत आहेत.
Anupama Fame Actor Nitish Pande Death