कानपूर (उत्तर प्रदेश) – कोलकाताहून दिल्लीला जाणाऱ्या आठ रोहिंग्यांच्या चौकशीत दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस) अनेक महत्त्वाची आणि खळबळजनक माहिती मिळाली आहे. यातील प्रमुख असलेला महफुजुर रहमान हा रोहिंग्यांना बांगलादेशातून भारतात आणायचा. त्यानंतर येथे त्यांची बनावट ओळखपत्रे बनवून तो दुबईला पाठवायचा. हे संपूर्ण रॅकेट आता उघडकीस आले आहे.
एटीएसच्या म्हणण्यानुसार, महफुजूर रहमानने ओन्ली ब्रो नावाने व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला होता. या गटात तो बांगलादेशी रोहिंग्यांचा समावेश करत होता. या ग्रुपमध्ये तो ओळखपत्रे तयार करणे आणि प्रवास योजनांची माहिती देत असे. या ग्रुपमधील आणखी दहा सदस्यांची माहिती एटीएसला मिळाली असून, त्यांचा तपशील शोधण्यात येत आहे.
प्रत्येकी एक लाख घेतले
अटक करण्यात आलेल्या आठ आरोपींनी एटीएसला सांगितले की, महफुजूर रहमानने त्यांच्याकडून प्रत्येकी एक लाख रुपये घेतले होते. तो सगळ्यांना दुबईला पाठवणार होता. महफुजूर रहमान हा स्वतः २०१० मध्ये भारतात पळून आला होता. मुळचा तो बांगलादेशातील बगाडा मासीगंज भागातील रहिवासी आहे. येथे आल्यानंतर त्याने फ्लॅट तिलजाला, उत्तर २४ परगणा, बंगाल या पत्त्यावर बनावट कागदपत्रे आणि पासपोर्ट बनवले. त्यानंतर तो याच पासपोर्टने २०१३ मध्ये दुबईला गेला होता. तेथून तो परत आला आणि बंगालमध्ये राहू लागला.
मूळ ओळखपत्र घरून मागवले
दुबईहून परतल्यानंतर महफुजुर रहमान पश्चिम बंगालमधील मार्टिनपारा येथे गेला. तेथे त्याने रिकाम्या मदरशांमध्ये आपले जाळे पसरवले. त्यांचा वापर बांगलादेशी रोहिंग्यांसाठी करून त्यांना तेथे ठेवून, हिंदी बोलणे आणि भारताच्या संस्कृतीबद्दल माहिती देत असे. एटीएसने अटक केलेल्या आठ जणांना बांगलादेशातील घरातून फोनवरून मूळ ओळखपत्रे मिळाली. त्यामुळे आरोपींची खरी ओळख उघड होऊ शकली.
कोठडीत ठेवणार
महफुजुर रहमानला कोलकाता येथून अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता एटीएस त्याची कोठडी घेऊन चौकशीसाठी लखनौला आणणार आहे. तपासात एटीएसला अनेक महत्त्वाची आणि खळबळजनक माहिती मिळाली आहे.
आरोपींची खरी नावे:
– असीदुल इस्लाम (बहादूरपूर बांगलादेश )
– भोरीचम कोमिल्ला (बांगलादेश)
– अलामीन अहमद अब्दुररहीम, (बडेसर, ढाका, बांगलादेश)
– जैबुल इस्लाम, (दत्तोग्राम सिल्हेट, बांगलादेश)
– जमील अहमद पोराग, (सेलिया, जमालगंज, बांगलादेश)
– राजीव हुसेन, (चैलापट्टी, ढाका, बांगलादेश)
– शाखावत खान, (गाझीपूर, ढाका, बांगलादेश)
– अलाउद्दीन तारिक (नोआखली, ढाका, बांगलादेश)