मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ५ लाख रुपयांची लाच घेताना अटक केलेल्या शिक्षण, प्रशिक्षण विभागाचा सहसंचालक अनिल मदनजी जाधव याच्याकडे मोठे घबाड सापडले आहे. एसीबीच्या पथकाने त्याच्या कार्यालय आणि घराची झडती घेतली आहे.
लाचखोर अनिल जाधवच्या मुंबईतील घरात १ कोटी ५९ लाख रुपयांची मालमत्ता आढळून आली आहे. त्यात सोन्याची नाणी, बिस्किटे, दागिने असे तब्बल १ किलो ७२ ग्रॅम सोने आढळून आले आहे. त्याची बाजारातील किंमत जवळपास ८० लाख रुपये आहे. तर, त्याच्या घरातून ७९ लाख ६३ हजार रुपयांची बेहिशोबी रोख रक्कम एसीबीच्या पथकाने जप्त केली आहे. त्यानंतर एसीबीने जाधवच्या कार्यालयाची झडती घेतली. त्यात २ लाख २८ हजार रुपयांची बेनामी रोख रक्कम प्राप्त झाली आहे. अशा प्रकारे जाधवकडील एकूण १ कोटी ६१ लाख ३८ हजार ३४५ रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी एसीबीचे पथक कसून चौकशी करीत असून जाधवकडे आणखी घबाड सापडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.