अमरावती (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मानवाच्या आरोग्य संवर्धनासाठी पर्यावरण व पशुस्वास्थ्य जपणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यानुसार ‘वन हेल्थ’ ही संकल्पना डोळ्यांसमोर ठेवून संघटित प्रयत्न व्हावेत. लम्पी त्वचारोगाबाबत लसीकरण व उपचार करतानाच भविष्यात अशा साथी पुन्हा उद्भवू नयेत यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था व सर्व विभागांच्या समन्वयाने सातत्यपूर्ण कार्यक्रम राबवावा, अशी सूचना केंद्रीय पथकाचे सदस्य व ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. विजयकुमार तेवतिया यांनी केली.
पशुंमधील लम्पी त्वचारोग साथीबाबत राबविण्यात आलेल्या उपाययोजनांच्या अनुषंगाने आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथकाच्या उपस्थितीत बैठक पशुसंवर्धन कार्यालयात झाली, त्यावेळी ते बोलत होते. डॉ. तेवतिया यांच्यासह या पथकात बंगळुरू येथील निवेदी संस्थेचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. मंजुनाथ रेड्डी, सहायक पशुसंवर्धन आयुक्त डॉ. सुनील लहाने यांचा समावेश आहे. सहआयुक्त डॉ. मोहन गोहत्रे, उपायुक्त डॉ. नितीन फुके, उपायुक्त डॉ. संजय कावरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पुरूषोत्तम सोळंके, सहायक आयुक्त डॉ. नंदकिशोर अवघड, डॉ. राजीव खेरडे आदी उपस्थित होते.
डॉ. तेवतिया म्हणाले की, माणूस, पशू, पर्यावरण हे सगळे एकमेकांशी जोडले गेलेले असतात. त्यांच्या परस्परसंबंधातूनच पर्यावरणाची साखळी विकसित झालेली आहे. त्यामुळे ‘वन हेल्थ’ संकल्पनेनुसार विषाणूजन्य आजार, तसेच साथरोग नियंत्रणासाठी सार्वत्रिक, संघटित व सातत्यपूर्ण प्रयत्न व्हावेत. त्यासाठी शासन, प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समन्वयही तेवढाच महत्त्वाचा आहे. नियमित स्वच्छता, जलस्त्रोतांची सुरक्षितता, पशुस्वास्थ्य व पर्यावरणाचे रक्षण यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी योगदान देणे आवश्यक आहे.
लम्पी आजार प्रतिबंधासाठी तत्काळ उपचार अत्यंत गरजेचा असतो. अनेकठिकाणी पशूंमध्ये प्रादुर्भाव झाल्यावर तीन-चार दिवसांनी जनावरे तपासणीसाठी येतात असे आढळते. जनावरांचे दूध कमी झाले किंवा लाळ गळत असल्याचे आढळल्यावर तत्काळ तपासणी आवश्यक आहे. त्यासाठी पशुपालकांपर्यंत पोहोचून त्यांना माहिती द्यावी. पशुसखी किंवा स्थानिक कर्मचाऱ्यांमार्फत सातत्याने जनजागृती व सर्वेक्षण करावे. प्रभावी जनजागृतीनेच वेळेत तपासणीसाठी प्रतिसाद मिळेल व साथ वेळेत आटोक्यात येईल. प्रतिजैविकांचा आवश्यक तिथेच वापर करण्याची सूचनाही त्यांनी केली.
डॉ. तेवतिया पुढे म्हणाले की, मृत जनावरांना पुरण्याची किंवा विल्हेवाटीची ठिकाणे स्वतंत्र असली पाहिजेत. त्या परिसरात जलस्त्रोत असता कामा नये जेणेकरून सुरक्षितता राखली जाईल. यासंदर्भातील सर्व नियम पाळले गेले पाहिजेत. स्थानिक स्वराज्य संस्थांनी हे कसोशीने पाळावे. म्हशींमध्ये हा आजार खूप आढळत नसला तरीही पुढील साथ टाळण्यासाठी त्यांना आजारी जनावरांपासून वेगळे ठेवले पाहिजे. पशुपालकांनी वेगवेगळ्या जनावरांचे दूध काढताना प्रत्येकवेळी हात सॅनिटाईज केले पाहिजेत. दूध तापवल्यानंतर संपूर्णत: निर्जुंतक व सुरक्षित असते. त्यामुळे कुठल्याही अफवा टाळल्या पाहिजेत, असेही ते म्हणाले.
यावेळी पथकाचे सदस्य डॉ. रेड्डी, सहायक आयुक्त डॉ. लहाने यांनीही जिल्ह्यातील पशुसंवर्धन अधिकाऱ्यांशी चर्चा करून सद्य:स्थिती जाणून घेतली. बैठकीनंतर पथकाने मोझरी येथील गोरक्षण संस्थेत व तिवसा पशुवैद्यकीय दवाखान्यात भेट देऊन पाहणी केली.
लम्पी आजार प्रतिबंधासाठी ४ लक्ष ३ हजार ५३६ जनावरांचे लसीकरण झाले आहे. मृत जनावरांच्या नुकसानभरपाईसाठी १६७८ प्रस्ताव प्राप्त झाले. त्यातील १५५९ प्रस्ताव मंजूर झाले असून, १४०३ पशुधनाची नुकसानभरपाई अनुदान वितरित करण्यात आले आहे.
Animals Milk Precaution Scientist Dr Vijaykumar Tevatiya Suggestion
Lumpi Skin Disease