मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रात्रंदिवस शासनाच्या सेवेत बांधील राहणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कोणतेही सरकार येवो, प्रत्येक गोष्टीसाठी दीर्घ काळ लढावे लागले आहे. करोना योद्धा म्हणून गौरविल्यानंतर आजतागायत सातत्याने आपण सन्मानाने जगण्यासाठी पुरेसे मानधन, निवृत्तीनंतर मासिक पेन्शन आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रॅच्युइटी या मागण्यांसाठी लढा देत आहोत परंतु आपल्याला खऱ्या अर्थाने न्याय मिळालेला नाही.
५२ दिवसांच्या संपकाळात देखील शासनाने पुढाकार घेऊन गांभीर्याने वाटाघाटी न करता सतत प्रशासनावर जबाबदारी टाकली. गेल्या २,३ बैठकांमध्ये प्रशासनानेच कृती समितीशी चर्चा केली व तोडगा काढला. परंतु प्रत्यक्ष कार्यवाहीला मात्र फारच विलंब लागत आहे. त्यातूनच मध्ये लोकसभेच्या निवडणुकांमुळे २ महिने वाया गेले व येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांमुळे लवकरच आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्यामुळे आपल्यामध्ये चिंता व संतापाची भावना निर्माण झाली आहे. २१ तारखेला आश्वासन मिळाल्यानंतर आपण १५ दिवसांची मुदत देऊन आंदोलन स्थगित केले होते. ही मुदत संपत असताना आपण पुन्हा एकदा रणशिंग फुंकत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने दिली.
असे आहे आंदोलन
- २,३,४ सप्टेंबर – ठाणे येथे तीन दिवसीय ठिय्या आंदोलन
- २ ते १३ सप्टेंबर – जिल्हा पातळीवर जेल भरो आंदोलन
या आहे मागण्या
- संपकाळात ५ डिसेंबर व २५ जानेवारी रोजी झालेल्या बैठकांमध्ये अनुक्रमे मा. महिला व बालविकास मंत्री व मा. प्रधान सचिव, महिला व बालविकास विभाग यांनी ‘आशांचे मानधन वाढल्यास अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन वाढवण्यात येईल.’ या दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करून भरीव मानधन वाढीचा निर्णय करा व ताबडतोब त्याचा शासकीय आदेश काढा.
- सर्वोच्च न्यायालयाने ग्रॅच्युइटीबाबत दिलेल्या निकालाच्या अंमलबजावणीबाबत शासकीय आदेश काढा.
- कमीत कमी योगदान आधारित मासिक पेन्शन योजना लागू करण्याच्या निर्णयाचा शासकीय आदेश ताबडतोब काढून त्याची अंमलबजावणी करा.
- मदतनिसांच्या सेविका पदी व सेविकांची मुख्य सेविका पदी नियुक्ती ताबडतोब सुरू करा.
- शासनाने तातडीने कार्यवाही करून वरील गोष्टींचे आदेश काढावेत व कार्यवाही सुरू करावी अन्यथा आपल्याला नाइलाजाने सणासुदीच्या दिवसांमध्ये आंदोलनात उतरवावे लागेल असा इशारा आपण शासनाला देत आहोत.