इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सध्या देशभरातील अनेक जिल्हे, शहरे, शहरातील कॉलनी, वस्त्या, गावे यांची यांचे नामांतर करण्यात येत आहेत. त्यामुळे काही ठिकाणी स्वागत होत असताना अनेक ठिकाणी मात्र यावरून वाद उद्भवत असल्याचे दिसून येते. आंध्रप्रदेश मध्ये अशाच प्रकारे जिल्ह्याच्या नामांतरावरून वाद उद्भवला असून या प्रकरणाला हिंसक वळण लागले आहे.
आंध्र प्रदेशातील कोनसीमा जिल्ह्याचे नामांतर बी.आर. आंबेडकर कोनसीमा असे करण्यात आल्यानंतर येथे निदर्शने हिंसक झाली. त्यामुळे 144 कलमही लागू करण्यात आले. अमलापुरममध्ये मंगळवारी आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्याच्या नामांतराच्या निषेधार्थ रॅली काढण्यात आली. हिंसाचारात आमदार पोनाडा सतीश यांचे घर जाळण्यात आले. मात्र, पोलिसांनी मंत्री आणि त्यांच्या कुटुंबीयांची सुटका केली. संतप्त जमावाने केलेल्या दगडफेकीत किमान 20 पोलीस जखमी झाले. आंदोलकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सुब्बा रेड्डी यांच्या वाहनावर दगडफेक केली. दोन स्कूलबससह अनेक वाहने रस्त्याच्या कडेला जाळण्यात आली. या हल्ल्यात जिल्हाप्रमुखांच्या डोक्याला दुखापत झाली.
पोलिसांनी काही समाजकंटकांना अटक केली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अमलापुरममध्ये अतिरिक्त फौजफाटा तैनात केला आहे. संतप्त जमावाने मंत्री पिनिपे विश्वरूप यांच्या कार्यालयाचीही तोडफोड केली. तसेच कामनगर परिसरात आग लागली. गृहमंत्री वनिता यांनी जिल्हा प्रशासनाशी बोलून अमलापुरममधील परिस्थितीचा आढावा घेतला. हिंसाचार करणाऱ्यांना सोडले जाणार नाही, असे ते म्हणाले. वनिता म्हणाल्या की, स्थानिक नागरिकांच्या ईच्छेनुसार भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकाराच्या नावावर कोनासीमा जिल्ह्याचे नाव बदलण्यात आले आहे.
तसेच आंध्र प्रदेश सरकारने या महिन्याच्या सुरुवातीला अधिसूचना जारी केली होती. ज्यामध्ये या प्रस्तावावर नागरिकांकडून हरकती किंवा सूचना मागविण्यात आल्या होत्या. मोठ्या दलित समाजाची लोकसंख्या असलेल्या कोनसीमा भागात राज्यातील एका जिल्ह्याला डॉ. बी.आर. आंबेडकरांचे नाव द्यावे, अशी मागणी होत होती.