पाझरतलावात आंघोळीसाठी गेलेल्या आठ वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

सुरगाणा – येथून जवळच असलेल्या भदर येथील पाझरतलावात आंघोळीसाठी गेलेल्या आठ वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. योहान शिवा वार्डे (८वर्षे) असे या मयत विद्यार्थ्याचे नाव असून तो भदर येथील जिल्हा परिषद शाळेत दुसऱ्या इयत्तेत शिक्षण घेत होता. वातावरणात उकाडा असल्याने शुक्रवारी दुपारी योहान हा मित्रांसोबत येथील पाझरतलावावर आंघोळीसाठी गेला होता. आंघोळ करीत असताना त्याचा पाय घसरून तो पाण्यात बुडाल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. दोन वर्षांपूर्वी आंघोळीसाठी गेलेल्या दोन मुलांचा याच पाझर तलावात बुडून मृत्यू झाला असल्याची माहिती यावेळी ग्रामस्थांनी दिली. पुढील तपास पोलीस करत आहेत.