मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बदलत्या हवामानाचा फटका सर्वसामान्य नागरिक सहन करू शकतात. व्हायरलच्या जाचातून दोन-तीन दिवसांत बाहेरही पडणे शक्य आहे. पण शेतकऱ्यांचं होणारं नुकसान कधीही भरून निघत नाही. सध्या दोन दिवस शेतकऱ्यांवर वातावरणाच्या बदलाचे अर्थात अवकाळी पावसाचे संकट ओढवण्याची शक्यता आहे.
गेल्या काही वर्षांपासून वातावरणातील बदल मोठ्या प्रमाणात अनुभवायला येत आहे. हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा या तिन्ही ऋतुंचा क्रम असला तरीही हिवाळ्यात पाऊस आणि पावसाळ्यात उन अशीही परिस्थिती आपण बघतोय. आत्ताच एक महिन्यापूर्वी जवळपास पाच दिवस संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण, काही ठिकाणी पाऊस आणि कडाक्याची थंडी असं चित्र होतं. त्यानंतर सरासरी थंडीचा सामना करावा लागला, त्यामुळे दिलासा होता. पण आता हवामान खात्याने दोन दिवस ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तवली आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. या पावसाचा शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसणार आहे. या पावसात सर्वाधिक नुकसान गव्हाच्या व हरभऱ्याच्या पिकाचे होईल. तर ऊस व कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसू शकतो. या अचानक झालेल्या बदलामुळे शेतकरी धास्तावला आहे.
नियोजन आवश्यक
बरेचदा हवामान व कृषीतज्ज्ञांकडून वातावरणातील बदलांनुसार शेतीचे नियोजन करण्याचा सल्ला दिला जातो. पण अवकाळी पावसाची माहिती आधीपासून कळत नाही, अश्यात शेतकऱ्यांनी नियोजन कसे करावे, हा प्रश्न कायम राहातो.
आधी थंडी आता पाऊस
गेल्या आठ दिवसांमध्ये नाशिक, खान्देशसह राज्यात अनेक ठिकाणी कडाक्याच्या थंडीची नोंद झाली. विदर्भात दिवसभर उकाडा आणि रात्री व पहाटे कडाक्याची थंडी लोक अनुभवत होते. आता वातावरणात अचानक बदल होऊन पुढचे दोन दिवस ढगाळ वातावरण व पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
Alert Rainfall Climate Weather Forecast IMD