मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वेगवेगळ्या योजनांच्या आधारे अधिक पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून गुंतवणुकदारांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या पंकज सोनू ठगबाजापासून सावध राहण्याचा इशारा नॅशनल स्टॉक एक्स्चेंज अर्थात एनएसईने दिला आहे.
पंकज सोनू नामक व्यक्ती ‘ट्रेडिंग मास्टर’ या नावाची संस्था चालवतो. यो दोन्हींपासून गुंतवणूकदारांनी लांब राहावे, असे एनएसईने सांगितले आहे. पंकज सोनू हा भोळ्या गुंतवणूकदारांशी संपर्क साधतो आणि त्यांना स्टॉक मार्केटच्या गुंतवणुकीवर खात्रीशीर परतावा देण्याचे आमिष दाखवतो. तसेच गुंतवणूकदारांनी त्यांच्या ट्रेडिंग खात्याचे लॉगिन डिटेल्स शेअर करावे, जेणेकरून तो स्वतः गुंतवणूकदारांच्या वतीने व्यवहार करू शकेल, अशी बतावणीदेखील या सोनूकडून करण्यात येते.
२०२१ साली स्थापन झालेल्या ट्रेडिंग मास्टरने दावा केला होता की, त्यांच्या कंपनीने स्वयंचलित ट्रेडिंग सेवा देणारे तंत्रज्ञान विकसित केले असून ट्रेडिंग मास्टर त्याद्वारे वित्तीय सेवा देत आहे. नोएडा, उत्तर प्रदेश येथे स्थित असलेल्या या कंपनीच्या वेबसाईटने असाही दावा केला की, त्यांच्याकडे आर्टिफिशिअल इंटेलिजेन्स प्रोग्रामिंग तंत्रज्ञान आहे आणि त्या माध्यमातून खात्रीशीर परतावा मिळतो. गेल्या वर्षी कंपनीने मास्टर बॉट लाँच केला होता. एआय सक्षम असलेले हे बॉट गुंतवणूकदारांना स्टॉक मार्केटमध्ये खरेदी आणि विक्रीचे संकेत देण्यात मदत करेल, असे सांगण्यात आले होते.
अशी होते फसवणूक
पंकज सोनू हा लोकांना सिक्युरिटीज मार्केटमध्ये चांगला परतावा मिळतो, असे सांगून गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करतो. त्याचबरोबर सोनू गुंतवणूकदारांना त्यांचे लॉगिन डिटेल्स आणि पासवर्ड शेअर करण्यास सांगून त्यांचे ट्रेडिंग खाते हाताळण्याची ऑफर देतो. अशा प्रकारे अनेक जण फसवणुकीला बळी पडले आहेत.
Alert NSE Investors Pankaj Sonu Fraud Trading