इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ग्लोबल वॉर्मिंगचे चटके गेल्या काही वर्षांपासून संपूर्ण मनुष्यजात अनुभवत आहे. अतिटोकाचे वातावरणीय बदल सातत्याने दिसून येताहेत. दरम्यान, २०२७मध्ये संपूर्ण जगाचे तापमान सरासरी १.५ अंश सेल्सिअसने वाढणार आहे. तसेच भविष्यात वातावरणातील बदलांमुळे मानवी आयुष्य अधिक भयावह होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
ब्रिटनच्या मेट ऑफिस हॅडली सेंटरमधील लांब पल्ल्याच्या हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अॅडम स्कॅफे म्हणाले की, पुढील चार-पाच वर्षांत आपण उष्णतेची ऐतिहासिक विक्रमी पातळी पाहू शकतो. तापमान दीड अंश सेल्सिअस वर जाईल. गेल्या वर्षी आलेल्या अहवालात याची शक्यता ५०-५० होती. पण पुन्हा केलेल्या अभ्यासानुसार आता ते ६६ टक्के आहे. ज्या भयानक अहवालात ही गोष्ट उघड झाली आहे त्याला ‘ग्लोबल -अॅन्युअल टू डेकॅडल क्लायमेट अपडेट’ असे नाव देण्यात आले आहे.
दरम्यान, जागतिक हवामान संघटनेने हा धक्कादायक खुलासा केला आहे. त्यानुसार पृथ्वीवर जळजळ वाढणार आहे. ३० वर्षांच्या सरासरी जागतिक तापमानाच्या आधारे हा खुलासा करण्यात आला आहे. २०२७ पर्यंत जगाचे तापमान दीड अंश सेल्सिअसने वाढणार असल्याचे संघटनेने म्हटले आहे. याची ६६ टक्के शक्यता असल्याचेही म्हटले आहे. पुढील पाच वर्षांत विक्रमी उष्माघात होण्याची ९८ टक्के शक्यता राहणार आहे. अवकाळी पाऊस, अचानक पूर, दुष्काळ, धुळीची वादळे, समुद्राची पातळी वाढणे. सागरी वादळे अशा घटना होणार आहेत.
अल-निनोचा प्रभाव राहणार
हवामान बदलाच्या अनुषंगाने भारताची स्थिती आणखी बिकट होणार आहे. डब्ल्यूएमओचे सरचिटणीस पीटीरी तालास यांनी दिलेल्या माहितीनुसार, अतितापमानवाढीमुळे एल-निनोची परिस्थितीही निर्माण होईल. यामुळे उष्णकटिबंधीय प्रशांत महासागराचा वरचा पृष्ठभाग उष्ण करेल. त्यामुळे वातावरणही उष्ण राहणार आहे. जेव्हा वातावरण तापते तेव्हा संपूर्ण जगाचे तापमान वाढेल. येत्या काही महिन्यांत अल- निनोचा प्रभाव संपूर्ण जगावर पाहायला मिळणार आहे.
Alert Climate Change Global Warming Report