बुलडाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अकोला जिल्ह्यातील पारस येथे मंदिर दुर्घटनेला कोण जबाबदार आहे, याबाबत आता आरोप-प्रत्यारोप होत आहेत. काहींनी केवळ दुर्दैवी घटना म्हणून त्याबद्दल खंत व्यक्त केली आहे. तर काहींनी अंधश्रद्धा व अघोरी पुजेमुळे हा प्रकार घडल्याचा आरोप केला आहे.
या घटनेला अंधश्रद्धा कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यावर कृषीमंत्री अब्दूल सत्तार यांनी चौकशी करण्यात येईल, अशी माहिती दिली आहे. विशेष म्हणजे या घटनेतील जखमींच्या उपचाराचा खर्च महाराष्ट्र सरकार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी कृषीमंत्री सत्तार वऱ्हाडाच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त गावांची पाहणी करून पारस येथील मंदिर परिसराला भेट दिली. जे झाड कोसळल्यामुळे दुर्घटना घडली ते दीडशे वर्ष जुने झाड होते आणि आतून पोकळ होते. त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टी पुढे येत असल्या तरी आत्ताच नक्की काही सांगता येणार नाही, असे सत्तार म्हणाले.
पारस येथील मंदिर दुर्घटनेसाठी अंधश्रद्धा व अघोरी पूजा जबाबदार असल्याच्या आरोपाबाबत विचारणा केली असता, त्यांनी याची चौकशी करण्यात येईल, असे सांगितले. चौकशी केल्याशिवाय याबाबत कुठलेही विधान करता येणार नाही, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री सहायता निधीतून मृतांच्या कुटुंबांना मदत देण्यात आली आहे. सर्व जखमींच्या शासकीय वा खासगी रुगणलायतील उपचाराचा खर्च शासन करणार असल्याचेही ते म्हणाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नागपुरात मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत करणार असल्याचे माध्यमांना सांगितले.
शेतकऱ्यांना दिलासा देणार
बुलढाणा जिल्ह्यातील चितोडा व अंबिकापूर (ता. खामगाव) या गावातील बाधित शेतीची पाहणी केली. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या निकषांप्रमाणे किंवा त्यापेक्षा जास्त मदत करण्यात येईल. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना यासंदर्भातील अहवाल सादर करण्यात येईल. त्यांना केंद्राच्या निकषांपेक्षा जास्त मदत करण्याचे अधिकार आहेत. याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, असेही कृषिमंत्र्यांनी सांगितले.
Akola Temple Accident Superstition Government Enquiry