मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वात बंडखोरी झाल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या गाठीभेटी घेतल्या जात आहेत. आज सलग दुसऱ्या दिवशी अजित पवार यांनी त्यांच्या समर्थक नेत्यांसह आमदारांची भेट घेतली. आपणच यातून काही तरी मार्ग काढा, अशी गळ सर्वांनी शरद पवार यांना घातली आहे. मात्र, या भेटीत नेमकं काय घडलं याचा मोठा खुलासा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.
राष्ट्रवादीत बंडखोरी झाल्यानंतरही अजित पवार यांच्यासह त्यांच्या गटातील नेते आणि सत्ताधारी सरकारमध्ये सहभागी झालेले मंत्री हे शरद पवार यांची भेट घेत आहेत. त्यामुळे सर्वत्र विविध चर्चांना उधाण आले आहे. या सर्वामागे शरद पवार असल्याचेही बोलले जात आहे. आत यासंदर्भात जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधत शरद पवार यांच्या भेटीमध्ये नक्की काय घडलं याविषयी उलगडा केला आहे. पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा राज्यात आणि केंद्रात विरोधी पक्ष आहे. त्यामुळे आमचे आमदार विरोधातच बसलेले आहेत. आमच्यातल्या ९ जणांनी सरकारमध्ये शपथ घेतली हे खरे आहे. पवार साहेबांनी भूमिका स्पष्ट केली आहे. शरद पवार यांच्या भूमिकेसंबंधी प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याचा प्रश्नच येत नाही. फुटलेल्या गटाने पवार साहेबांना विनंती केली आणि निर्माण झालेल्या परिस्थितीतून मार्ग काढा असा आग्रह केला. परंतु शरद पवार यांनी येवल्यामध्येच भूमिका स्पष्ट केली आहे. ”बाहेर पडलेल्या गटाने दिलगिरी व्यक्त करुन एकत्रित काम करण्यासंदर्भात पुन्हा विनंती केल्याने शेवटी शरद पवार साहेबांनी म्हटलं की, मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे, आता यापुढे काय मार्ग काढायचा हे तुम्हीच सांगा.” असा खुलासा पाटील यांनी केला आहे.
पाटील पुढे म्हणाले की, आपल्या घरात कुणी आलं तर विश्लेषणात्मक टिपण्णी करणं योग्य नाही. पवार साहेबांनी येवल्याला जावून भूमिका स्पष्ट केलेली आहे. जे दहा-पंधरा दिवसांमध्ये वेगळं वागलेले आहेत, तेच येवून भेटत आहेत. जे पवारांना घरी बसा म्हटले तेच येवून भेटून विनवण्या करीत आहेत. आज विधानसभेचे २०-२२ आमदार आणि विधान परिषदेचे तीन ते चार आमदार आले होते. पवार साहेबांची भूमिका जी आहे ती स्पष्ट आहे, असे पाटील यांनी सांगितले.