शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उत्तर अहमदनगर जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ३१ मे २०२३ रोजी घेण्यात येणार आहे. पाच तालुक्याचे लाभक्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा ऐतिहासिक क्षण असणार आहे. अशी माहिती महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिली.
अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाच्या कार्यस्थळावर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अधिकारी – कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ, जलसंपदा विभागाचे अभियंता अरूण नाईक, पोलीस उपअधीक्षक नारायण वाकचौरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता श्रीनिवास वर्पे, कृषी विभागाचे श्री.गायकवाड, माजी मंत्री मधुकरराव पिचड, वैभव पिचड, सिताराम भांगरे, सोनाली नाईकवाडी, शिवाजीराव धुमाळ यांच्यासह पदाधिकारी, शेतकरी , कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ३१ मे रोजी २०२३ सकाळी १० वाजता होणाऱ्या कार्यक्रमाच्या स्थळाची पाहणी महसूलमंत्र्यांनी यावेळी केली. येत्या काही दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याही दौरा होण्याची शक्यता लक्षात घेवून त्याचेही नियोजन आतापासूनच सुरू करण्याबाबतही सूचनाही महसूलमंत्री श्री. विखे पाटील यांनी यावेळी दिल्या. अकोले व संगमनेर तालुक्यातील सर्व कालव्यांची पाहणी करीत महसूलमंत्र्यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे जाणून घेतले. शेतकऱ्यांच्या मागण्याबाबत त्यांनी यावेळी आश्वासीत केले.
धरणासाठी जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना गायरान जमिनी देण्यात आल्या होत्या. या जमिनीच्या बाबतीत अद्यापही प्रश्न शासन स्तरावर प्रलंबित असल्याने याबाबत तातडीने प्रस्ताव तयार करून पाठविणाच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. याबाबत धोरणात्मक निर्णय शासन स्तरावर घेवून न्याय मिळवून देण्याची ग्वाही महसूलमंत्री श्री विखे पाटील यांनी यावेळी दिली.
धरणाच्या उजव्या कालव्याचे कामाची माहिती त्यांनी जाणून घेतली. ही कामे पूर्ण होण्यास तीन महिन्याचा कालावधी लागणार असला तरी दोन महिन्यात काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवूनच ही कामे पूर्ण करण्याबाबत विभागाने कार्यवाही करावी. अशा सूचना ही महसूलमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
Ahmednagar Nilwande Dam Water Release