अहिल्यानगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या अपील प्रकरणांवर ई-सुनावणी प्रक्रियेला अपर जिल्हाधिकारी यांच्या दालनात प्रारंभ करण्यात आला आहे. या माध्यमातून जमीन व मालमत्तेशी संबंधित वाद, हक्क नोंदणी, फेरफार, उताऱ्यावरील दुरुस्ती तसेच मालकी हक्काच्या प्रकरणांवर आता ऑनलाईन पद्धतीने सुनावणी होणार आहे. ई सुनावणीमुळे महसूल विभागातील प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी होण्यास मदत होणार आहे.
शासनाकडून संपूर्ण महसूल व्यवस्थेला डिजिटायझेशनच्या दिशेने नेत, ‘पेपरलेस व पारदर्शक प्रशासन’ देण्याचा प्रयत्न केला जात आहे. ई सुनावणी ही नवीन संकल्पना सामान्य नागरिकांसाठी हितकारक आहे. यातून महसूल प्रकरणांवरील निर्णय जलदगतीने होऊन कामकाजात अधिक आणि सुसूत्रता येईल. येत्या काळात तालुका कार्यालयांमध्येही ही सेवा कार्यान्वित करण्यात येणार असून, नागरिकांना त्यांच्या घरी बसूनच न्याय मिळवण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले.
आता पक्षकारांना तसेच विधिज्ञांना जिल्हाधिकारी कार्यालयात वारंवार येण्याची गरज नाही. ई-सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतली जाणार असल्याने घरबसल्या आपले म्हणणे मांडता येईल. यामुळे वेळ, प्रवासाचा खर्च व श्रम वाचण्यास मोठी मदत होणार आहे. शिवाय पारदर्शकपणे आणि वेळेत निर्णय देणे यामुळे शक्य होणार असल्याचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यावेळी म्हणाले.