अहमदनगर – राज्याच्या जवळपास सर्वच भागात दुसरी लाट ओसरत असताना नगर जिल्ह्यात मात्र चिंता वाढविणारे चित्र आहे. दोन दिवसांपूर्वीच नगर जिल्हाधिकाऱ्यांनी ६१ गावांमध्ये लॉकडाऊन घोषित केला असताना आता यात आणखी काही गावांची भर पडली आहे. ज्या गावांचा पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्क्यापेक्षा अधिक आहे तेथे कोराना निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे लॉकडाऊन असलेल्या गावांची संख्या आता ६९ झाली आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयाला खासदार सुजय विखे-पाटील यांनी कडाडून विरोध दर्शविला आहे. तर, पारनेरसह अनेक ठिकाणच्या व्यापाऱ्यांनीही निर्बंधांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आता ज्या ८ गावांमध्ये निर्बंध लावण्यात आले आहेत त्यामध्ये संगमनेर तालुक्यातील राजापूर, पिंप्री लौकी, आजमपूर, नेवासा तालुक्यातील चांदा, पारनेरमधील निघोज, वाडेगव्हाण, टाकळी ढोकेश्वर, अळकुटी आणि शेवगावमधील वडुले बु. या गावांचा समावेश आहे.