अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काही परंपरा दशकानुदशके जपल्या जात असतात. यामध्ये काही अघोरी प्रथांचाही समावेश असल्याचे बघायला मिळते. आजच्या विज्ञान – तंत्रज्ञानाच्या काळातदेखील अशा परंपरा सुरु आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात अशीच एक परंपरा असून वर्षानुवर्ष ती पाळली जाते. नुकतीच तेथील हनुमान टाकळी येथे रहाड यात्रा पार पडली. या यात्रेत पेटत्या विस्तवावरून अनवानी पायाने चालण्याची परंपरा असून ती आजही जपली जाते. गटारी अमावस्येच्या दिवशी या ठिकाणी हनुमानाचं मंदिर सापडलं होतं. त्या निमित्तानं दरवर्षी याच दिवशी ही यात्रा भरते आणि विस्तवावरुन चालण्याची परंपरा जोपासली जाते.
या परंपरेमागे एक आख्यायिका सांगितली जाते. हनुमान टाकळी येथे समर्थ रामदास स्वामींनी हनुमानाच्या मूर्तीची स्थापना केली होती. या हनुमानाकडे एखादा नवस केला तर तो पूर्ण होतो अशी इथल्या भाविकांची श्रद्धा आहे. नवसपूर्ती झाली तर मंदिरासमोरील विस्तवावरून चालण्याची परंपरा आहे. यात्रेच्या दिवशी मंदिराच्या समोर १२ फुट लांबीचा, २ फूट खोल, अडीच फूट रुंद चर खोदला जातो. त्यात बोरीच्या झाडाच्या लाकडं पेटवली जातात आणि भाविक या पेटत्या विस्तवावरून चालतात.
कोरोनाच्या संकटामुळे गेल्या दोन वर्षात या यात्रेमध्ये खंड पडला होता. आता मात्र कुठलेही निर्बंध नसल्याने भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. मोठ्या उत्साहात ही यात्रा साजरी करण्यात आली. भाविकांची लांबच लांब रांग पेटत्या विस्तवावरून अनवानी चालण्यासाठी यंदा दिसून आली. देवाजवळ केलेला नवस पूर्ण झाल्याने आणि श्रद्धेपोटी विस्तवावरून चालण्याची परंपरा अहमदनगरच्या हनुमान टाकळी येथे जवळपास २५० वर्षांपासून जपली जात आहे. या यात्रेला जिल्ह्यासह आसपासच्या जिल्ह्यामधून देखील भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित राहत असतात.
चटका न बसण्याचे कारण
अंधश्रद्धा निर्मुलन समितीने या परंपरेवर आपलं मत व्यक्त केलं आहे. नवस हाच मुळात अंधश्रद्धेचा भाग असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. पेटत्या विस्तवावरून वेगाने चालत गेल्यास पायाला चटका बसत नाही असं अंनिसच्या रंजना गवांदे यांनी स्पष्ट केलं. आजच्या वैज्ञानिक युगात आपण कितीही पुढारलो असलो तरी आजही अनेक उच्च शिक्षित तरुणही अशा प्रथा परंपरा जोपासताना या हनुमान टाकळीत दिसून येतात.
Ahemadnagar Hanuman Takli Tradition Rahad Yatra Pathardi