पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशात सर्वाधिक द्राक्षाचे उत्पादन महाराष्ट्रात होत असून द्राक्ष निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा ९८ टक्के असून महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादित बागाईतदार शेतकऱ्यांच्या अडचणी, समस्या प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ यांच्यावतीने आयोजित ६३ व्या द्राक्ष परिषदेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाचे अध्यक्ष शिवाजी पवार, उपाध्यक्ष कैलास पवार, खजिनदार सुनिल पवार, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. संजय सावंत आदी उपस्थित होते.
श्री. पवार म्हणाले, द्राक्ष हे नगदी पीक असून परकीय चलन मिळवून देणारा हा व्यवसाय आहे. शेतकऱ्यांना तयार द्राक्ष ग्राहकापर्यंत पोहचे पर्यंत खूप मेहनत घ्यावी लागते. द्राक्ष बागायतीसाठी वीज, पुरेसे पाणी, चांगल्या प्रतीची खते यांची नितांत गरज असते. कधी कधी नैसर्गिक आपत्तीलाही सामोरे जावे लागते. शेतकऱ्यांना बाजारपेठेची साथ मिळणे आवश्यक आहे. त्यासोबतच कृषी मालावर प्रक्रिया करण्यावर त्यांनी भर द्यावा. द्राक्ष बागायतदारांच्या सौर उर्जा पॅनेलसाठी अनुदान, सेवा कर रद्द करणे, व इतर प्रश्नावर सप्टेंबर महिन्यात कृषी, जलसंपदा, महावितरण व वित्त विभागाची बैठक लावून कामे मार्गी लावली जातील, असेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाकडून राज्यातील द्राक्ष उत्पादित शेतकऱ्यांसाठी मागील वर्षी ३ हजार १७ कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झाले होते. परंतू काही अटींमुळे त्यातील ५० टक्के अनुदान खर्च झाले असून ५० टक्के अनुदान परत करण्यात आले. केंद्र शासनाच्या अटींवर केंद्रातील संबंधित विभागाशी संपर्क करुन हा प्रश्नही मार्गी लावला जाईल. शेती क्षेत्रातही कृत्रिम बुद्धिमत्ताचे नवीन पर्व सुरू झाले आहे. शेतकऱ्यांनी या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यासोबत विषमुक्त सेंद्रिय शेतीकडे वळावे, असे आवाहन श्री.पवार यांनी केले.
राज्यात द्राक्ष उत्पादन वाढावे यासाठी संघाच्या माध्यमातून करण्यात येणारे कार्य उल्लेखनीय आहे. राज्यातील ४ कृषी विद्यापीठेही फळांचे उत्पादन वाढावे याकरिता संशोधन करित आहेत असे सांगून काही द्राक्ष बागाईतदार शेतकरीही द्राक्षाच्या नवीन जाती शोधण्याचे काम करीत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. प्रास्ताविकात संघाचे उपाध्यक्ष श्री. भोसले यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. यावेळी राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. आर. जी. सोमकुवर, वरिष्ठ शास्त्रज्ञ (कीटक शास्त्र) डॉ. डी.एस. यादव, वनस्पती रोगशास्त्र डॉ. एस. के. होळकर, फळ विज्ञान शास्त्रज्ञ डॉ. पी. एच निकुंबे, माजी प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. जी. एस. प्रकाश, शास्त्रज्ञ डॉ.गिरीष टी. आर, द्राक्ष बागायतदार आदी उपस्थित होते.
Regarding the problems of horticultural farmers producing grapes
Agriculture Grape Producer Farmers Subsidy Return