नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- रिक्षाप्रवासात महिलेचे सुमारे पावणे दोन लाख रूपये किमतीचे दागिणे चोरट्यांनी चोरून नेले. सह प्रवासी असलेल्या भामट्या महिलांनी हात की सफाई केल्याचा आरोप महिलेने केला असून याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निता रमेश रिक्कल (रा.नायरा पेट्रोल पंपाजवळ,रेस्ट कॅम्परोड देवळाली कॅम्प) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. निता रिंक्कल या गेल्या १२ एप्रिल रोजी सायंकाळी लॅमरोड भागात गेल्या होत्या. बना चाळ ते लॅमरोड दरम्यानच्या रिक्षा प्रवासात अज्ञात भामट्या महिलेने त्यांच्या पिशवीतील दागिन्यांचे पाकिट चोरून नेले. त्यात मनीमगळसूत्र, नेकलेस व जोड झुमके असा सुमारे १ लाख ८३ हजार रूपये किमतीचा ऐवज होता. अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.
………
बजरंगवाडीत तडिपार जेरबंद
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- हद्दपारीची कारवाई करूनही शहरात वावरणा-या तडिपारास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. ही कारवाई बजरंगवाडी येथील महादेव मंदिर परिसरात करण्यात आली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आदित्य सुनिल गायकवाड उर्फ टग्या मोरे (२१ रा. महादेव मंदिराजवळ बजरंगवाडी) असे अटक करण्यात आलेल्या संशयित तडिपाराचे नाव आहे. टग्या मोरे याच्या वाढत्या गुन्हेगारीस रोखण्यासाठी शहर पोलीसांनी त्याच्या विरूध्द हद्दपारीची कारवाई केली आहे.
शहर आणि जिल्ह्यातून त्यास दोन वर्षांसाठी तडिपार केलेले असतांना त्याचा वावर शहरातच आहे. पोलीस त्याच्या मागावर असतांना शुक्रवारी (दि.६) दुपारी तो आपल्या घर परिसरात मिळून आला. याबाबत अंमलदार राजेंद्र नाकोडे यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास पोलीस नाईक जाधव करीत आहेत.