नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती तर्फे २१ ऑगस्ट रोजी एक दिवसाचा राज्यव्यापी लाक्षणिक संप करून अंगणवाडी कर्मचारी भगिनी मोठ्या संख्येने आझाद मैदानावर जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहे.
या संपाविषयी कृती समितीने सांगितले की, गेल्या दीड, दोन वर्षांपासून सुमारे २ लाख अंगणवाडी कर्मचारी सतत लढत आहेत. काय मागतायत त्या तर जगण्याइतके मानधन, महागाईपासून संरक्षण देणारा महागाई भत्ता, ग्रॅच्युइटीच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अधिकाराची अंमलबजावणी, संपूर्ण आयुष्य योजना राबविण्यासाठी दिल्यानंतर म्हातारपणाची सोय म्हणून मासिक पेन्शन….० ते ६ वयोगटाची बालके आणि त्यांच्या माता यांची सर्वतोपरी काळजी घेणाऱ्या, बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांचे कुपोषण दूर करण्यासाठी झिजणाऱ्या या कष्टकरी महिलांच्या मागण्या रास्त नाहीत काय?
अंगणवाडी कर्मचाऱ्यांची कृती समिती या मागण्या मान्य करून घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे पण महायुती सरकारच्या दगडी हृदयाला काही पाझर फुटत नाही! त्यांना त्यांचा हक्क द्यायचा सोडून हे सरकार सर्व कल्याणकारी योजनांचा निधी पळवून लाडक्या बहिणींच्या झोळीत घालत आहे. आणि त्यासाठी सुद्धा अंगणवाडी कर्मचाऱ्यांनाच वेठीला धरत आहे. सरकारची कोणतीही योजना येवो, आपले दैनंदिन कामकाज करून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्या योजना यशस्वी करण्यासाठी मर मर राबावे लागते. पण बदल्यात त्यांना काय मिळते? किमान वेतनाच्या पासंगालाही पुरणार नाही असे अल्प मानधन. म्हातारपणी वर्षभर सुद्धा न पुरणारा एकरकमी सेवा समाप्ती लाभ…. बस्स, इतकेच!
महागाई भत्त्याला जोडलेले किमान वेतनाइतके मानधन, ग्रॅच्युईटी, मासिक पेन्शन, आहार व इंधनाच्या दरात वाढ, मदतनिसांची सेविका पदी व सेविकांची पर्यवेक्षिका पदी बढती यांचे अन्यायकारक निकष बदलणे, मिनी अंगणवाड्यांचे मुख्य अंगणवाडीत रुपांतर, अंगणवाडीच्या भाड्यात वाढ या महत्वाच्या व मूलभूत मागण्यांसाठी त्यांनी फेब्रुवारी २०२३ मध्ये संप केला परंतु १५०० व १००० रुपयांची मानधन वाढ वगळता पोकळ आश्वासनांखेरीज काहीच पदरात पडले नाही. आश्वासनांची पूर्तता व भरीव मानधन वाढ या मागण्यांसाठी पुन्हा ४ डिसेंबर २०२३ ते २५ जानेवारी २०२४ या कालावधीत प्रदीर्घ संप करावा लागला. आशांइतकी मानधन वाढ, ग्रॅच्युईटी, पेन्शन याची आश्वासने मिळाल्यामुळे वाटाघाटी होऊन संप मागे घेण्यात आला. परंतु मिनी अंगणवाड्यांचे रुपांतर वगळता अजूनही या आश्वासनांची पूर्तता झालेली नाही. आता त्यांची सहनशक्ती संपली आहे. या सरकारचे थोडेच दिवस शिल्लक राहिले आहेत. आता एक शेवटचा दणका देण्यासाठी त्या लाक्षणिक संप करून, अंगणवाड्या बंद करून २१ ऑगस्टला मोठ्या संख्येने आझाद मैदानावर धाव घेत आहेत. आता तरी शासन आपल्या या वेठबिगार, लाडक्या नसलेल्या बहिणींचा आवाज ऐकणार काय ? असा प्रश्न महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे एम ए पाटील, शुभा शमीम, दिलीप उटाणे, कमल परुळेकर, भगवानराव देशमुख, जीवन सुरुडे, जयश्री पाटील यांनी केला आहे.