काबूल – अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळविल्यानंतर देशातील माध्यमांमध्येही बदल दिसून आला आहे. सर्व दूरचित्र वाहिन्यांवर आता संगीत आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांची जागा धार्मिक कार्यक्रमांनी घेतली आहे.
तालिबान शासनाच्या नव्या कायद्यात स्वतःला त्या वातावरणात एकरूप होण्यास अफगाण माध्यमांना काहीच वेळ लागला नाही. त्यानुसारच आता लहान पडद्यांवर धार्मिक बाबींशी निगडित बातम्या प्रसारित होऊ लागल्या आहेत. विविध कार्यक्रमांमध्ये तालिबान नेत्यांवर कौतुकांचा वर्षाव केला जात आहे. तालिबानने सर्वात आधी २ ऑगस्ट २०२१ ला हेलमंड येथील राष्ट्रीय रेडिओ स्टेशनवर ताबा मिळविला होता.
तसेच वेगाने इतर दूरचित्र वाहिन्यांवरही त्यांना ताबा मिळवून प्रसारण बंद करून टाकले. तालिबानच्या विचारसरणीनुसार वाहिन्यांनी सर्व कार्यक्रम बदलले. त्याचा परिणाम चित्रपट उद्योगांसह सर्वसामान्यांवरही पाहायला मिळाला. लोकांनी सोशल मीडिया अकाउंटवरून आपापले छायाचित्रे हटविण्यास सुरुवात केली आहे. त्याशिवाय माध्यमांमधील महिला निवेदक आता हिजाबचा पेहराव करत आहेत.
दूरचित्रवाहिन्यांमधील प्रमुख बदल
१) तालिबान नेत्यांच्या मुलाखती जास्तीत जास्त दाखविणे
२) संगीताशी संबंधित सर्व कार्यक्रम बंद
३) शरियत कायद्यांचे फायदे सांगितले जात आहेत
४) राष्ट्रीय रेडिओ स्टेशनवर तालिबानचे गुणगाण
५) महिला निवेदकांना हिजाब अनिवार्य केले
आव्हानात वाढ
अफगाणिस्तानात माध्यमातील लोकांना गंभीर आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. अनेक वाहिन्या बंद झाल्यामुळे कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. ज्यांची नोकरी वाचली त्यांना मोठी जोखीम घ्यावी लागत आहे. अफगाणिस्तानातील पत्रकारांसाठी हा सर्वत कठीण काळ आहे, असे आंतरराष्ट्रीय पत्रकार संघाचे उपमहासचिव जर्मी डियर यांनी सांगितले.
तालिबान्यांकडून वापर
तालिबान माध्यमांचा वापर करण्यात पटाईत आहेत. त्यामुळेच अल-जझिरा या आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रसिद्ध वृत्तवाहिनीला विशेष परवानगी देऊन एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली. तत्पूर्वी तालिबानने अफगाणिस्तानातील दूरचित्रवाहिन्यांचे प्रसारण बंद करून टाकले. महिला कर्मचार्यांना काम करण्यास रोखण्यात आले. परंतु कठोर सूचना करून त्यांना काम करण्यास परवानगी देण्यात आली.
चित्रपटाचे भवितव्य अंधारात
अफगाणिस्तानात चित्रपट क्षेत्राची २००१ पासून भरभराट सुरू झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत त्यांच्या चित्रपटांचे कौतुक करण्यात आले. तसेच अनेक प्रतिष्ठीत पुरस्कारही त्यांना मिळाले. २००३ मध्ये निर्मित ओसामा या चित्रपटाने गोल्डन ग्लोब पुरस्कार पटकाविला होता. परंतु अफगाणिस्तानात तालिबान्यांनी पुन्हा शिरकाव केल्यामुळे या क्षेत्राचे भवितव्य अंधारात आहे.
संबंधित समिती गठित
तालिबानच्या म्हणण्यानुसार, माध्यमांशी संबंधित एक समिती गठित केली जाणार आहे. तीन सदस्यीय समितीमध्ये तालिबानमधील एक प्रतिनिधी, माध्यम सुरक्षा संघाचे उपप्रमुख आणि काबूल पोलिसांचे एक अधिकार्यांचा समावेश असेल, अशी माहिती तालिबानचा प्रवक्ता जबिहउल्लाह मुजाहिद याने दिली.