इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भारताच्या स्वदेशी संरक्षण क्षमता वाढवण्याच्या आणि देशांतर्गत एक भक्कम एरोस्पेस औद्योगिक परिसंस्था विस्तारण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी प्रगत मध्यम लढाऊ विमान कार्यक्रम(एएमसीए) अंमलबजावणी प्रारूपाला मान्यता दिली आहे. वैमानिक विकास संस्था (एडीए) उद्योग भागीदारीद्वारे हा कार्यक्रम राबविण्यास सज्ज आहे.
अंमलबजावणी प्रारूप दृष्टिकोन खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रांना स्पर्धात्मक आधारावर समान संधी प्रदान करतो. ते स्वतंत्रपणे किंवा संयुक्त उपक्रम म्हणून किंवा संघ म्हणून बोली लावू शकतात. संस्था/बोलीदार, देशाच्या कायद्यांचे आणि नियमनांचे अनुपालन करणारी भारतीय कंपनी असावी.
एएमसीए प्रोटोटाइप विकसित करण्यासाठी स्वदेशी कौशल्य, कार्यकुशलता आणि क्षमता यांचा वापर करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे, जे एरोस्पेस क्षेत्रातील आत्मनिर्भरतेच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा असेल.
एडीए लवकरच एएमसीए विकास टप्प्यासाठी स्वारस्य अभिव्यक्ती (ईओआय) जारी करेल.