नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- तंबाखू मागण्याचा बहाणा करून भामट्याने रिक्षाचालकावर धारदार शस्त्राने हल्ला करून लुटल्याची घटना गोदाघाटावर घडली. या घटनेत जखमी रिक्षाचालकाच्या खिशातील साडे सात हजार रूपयांची रोकड काढून हल्लेखोराने पोबारा केला असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेंद्र पुंडलिक सपकाळे (३८ रा. जगन्नाथ लॉन्स, रामेश्वर नगर कलानगर पाटााजवळ म्हसरूळ) या रिक्षाचालकाने याबाबत फिर्याद दिली आहे. सपकाळे गोदाघाटावर प्रवासी वाहतूकीचा व्यवसाय करतात गेल्या सोमवारी (दि.१९) रात्री खंडेराव मंदिर परिसरात एमएच १५ एफयू १२०९ अॅटोरिक्षा पार्क करून ते झोपी गेले असता ही घटना घडली. पहाटे तीनच्या सुमारास एका अनोळखी इसमाने त्याना उठवून तंबाखू पुडीची मागणी केली. सपकाळे यांनी नकार देत तंबाखू खात नसल्याचे सांगितल्याने संशयिताने जवळ येवून त्यांना धारदार शस्त्राचा धाक दाखविला.
या घटनेत भयभित झालेल्या सपकाळे यांच्या खिशातील साडे सात हजार रूपयांची रोकड बळजबरीने काढून घेत सदर इसमाने सपकाळे यांच्या हातावर पोटावर व पाठीवर धारदार शस्त्राने वार केले. जखमी अवस्थेत सपकाळे रूग्णालयात उपचार घेत असून त्यांच्या जबाबावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक गायकवाड करीत आहेत.