मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पेसा भरती आणि धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी मंत्रालयातील सरंक्षक जाळीवर आदिवासी आमदारांनी उड्या मारत आंदोलन केले. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आणि उपसभापती नरहरी झिरवाळ, काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर, किरण लहामाटे, भाजप खासदार हेमंत सावरा यांनी या उड्या मारल्या. यावेळी त्यांनी काही कागदपत्रेही फेकून दिली.
गेल्या पंधरा दिवसांपासून आदिवासी विद्यार्थी पेसा कायद्यांतर्गत आमची भरती करा अशी मागणी करत आहेत. त्यांनी मुंबईत ठिकठिकाणी आंदोलनही केली. मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष केले गेले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आम्ही मागील सहा दिवसांपासून भेटीसाठी वेळ मागत आहे. मात्र तरीदेखील भेट दिली नाही. त्यामुळे आम्हाला प्लॅन बी निवडावा लागला असे त्यांनी सांगितले.
या आमदारांनी मंत्रालयातील तीस-या मजल्यावरुन संरक्षक जाळीवर उड्या मारल्यानंतर या आमदारांना पोलिस बाजूला घेऊन गेले आहेत. आदिवासी मुलांनी काही बरं वाईट करु नये यासाठी आम्ही हे पाऊल उचलल्याचे आमदार नरहरी झिरवळ यांनी सांगितले. यावेळी त्यांचे अश्रू अनावर झाले.