अधिक मास विशेष (भाग २)
अधिकमास पुरुषोत्तम महिना कसा झाला?
कहाणी गुणसुंदरीची!
अधिक महिना किंवा अधिक मास ज्याची आपण सगळे गेल्या तीन वर्षांपासून उत्सुकतेने वाट पाहत होतो तो अधिक मास आज पासून सुरु झाला आहे. धोंड्याचा महिना,ज्याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात, हा हिंदू कॅलेंडर मधील एक अतिरिक्त महिना आहे जो दर तीन वर्षांतून एकदा येतो.तर असा हा बोनस महिना सुरु झाला आहे.
अधिक मास हा महिना अतिशय शुभ मानला जातो आणि आध्यात्मिक विकास आणि भक्तीसाठी एक आदर्श काळ मानला जातो. भगवान विष्णू हे या महिन्याचे अधिपति आहेत. त्यामुळे भगवान विष्णुंचा कृपाशिर्वाद मिळविण्यासाठी भक्त विविध धार्मिक विधी आणि व्रत वैकल्ये करतात.
अधिक मासाची उत्पत्ती प्राचीन काळापासून झाली कारण हिंदू कॅलेंडर चंद्रावर आधारित होते. चंद्र आणि सौर कॅलेंडरमधील फरकामुळे, दोन कॅलेंडर समक्रमित करण्यासाठी दर तीन वर्षांनी एक अतिरिक्त महिना जोडला गेला. या अतिरिक्त महिन्याला अधिक मास असे नाव देण्यात आले, म्हणजे “अतिरिक्त महिना.” अध्यात्मिक आणि धार्मिक कार्यांसाठी अधिक महत्त्वाचा महिना मानला जातो. या महिन्यात बरेच भक्त उपवास करतात, दानधर्म करतात आणि इतर धार्मिक विधि करतात.
कालच्या भागात भगवान विष्णुच्या कृपे मुळे गो-लोकातील मुरलीधर पुरुषोत्तमाचे तेजस्वी दर्शन झाल्याने ‘मलमास’ किंवा ‘मलिन मास’ याचे प्रत्यक्ष पुरुषोत्तमात दिव्य रुपांत रूपान्तर झाल्याची कथा आपण वाचली. आज अधिक मास साजरा करण्यामागील कथा आपण पाहणार आहोत.
गुणसुंदरीचे नशीब
मानवी स्वभाव मोठा विचित्र असतो. ज्या गोष्टीची किंवा परिस्थितीची आपण वाट पाहतो ती प्राप्त झाल्यावर देखील आपण समाधानी होत नाही. अपेक्षित परिस्थिती देखील आपण समाधानाने उपभोगू शकत नाही. अधिक मासाच्या पहिल्या दिवशी अशा एका राजा राणीची कथा आपण पाहणार आहोत.
प्राचीन काळी हैश्य नावाच्या देशाचा राजा होता, दृढधण्वा, आणि त्याची राणी होती गुणसुंदरी, दोघंही खूप आनंदात असायचे, अमाप संपत्ती, सद्गुणी संतती, राज्यात सर्वत्र सुखशांती होती. पण जास्त सुख सुध्दा कोणाकोणाला खुपते. त्से ते या राजा राणीला देखील खुपत होते.
राजाला नेहमी शंका यायची. आपल्याला हे इतके वैभव कशामुळं मिळालं? जगात सर्वत्र दुःख भरलेलं असतांना आपणंच एवढे सुखी कसे? आजचं हे सुख उद्याचं दुःख तर नाही होणार? याच विचारात राजा नेहमी मग्न असायचा.
याच विचाराच्या भरात तो एक दिवस शिकारीला गेला, तो खूपच थकून गेला होता, एका सरोवराच्या काठी झाडाखाली जाऊन बसला. आराम करतांना सुध्दा त्याचे ते विचारचक्र चालूच होते, तेवढ्यात त्या झाडावर एक पोपट येऊन बसला आणि झाडाच्या एका फांदीवरून तो बोलू लागला.
पोपट म्हणू लागला की, ” हे महाराज तुमचं हे वैभव इतकं सूख सर्वकाही मात्र इंद्रियाचं सुख आहे. शरीरापेक्षा मनाची शांती सर्वात श्रेष्ठ असते. सुखोपभोगपेक्षा वासनांचा त्याग करून दानधर्म करा. तेच तुमचे पुण्य पुढच्या जन्माला लाभतील.”
पोपटानं सांगितलेले ते वचन राजाने शांत बसून ऐकून घेतले. त्यांनी ती हकीकत राणीला येऊन सांगितली. तेव्हा राणी म्हणाली महाराज, ‘हे ही आपले नशीबच’. त्या पोपटानी सांगितलेले ते वचन ही सत्य. पण खरं सुख म्हणजे मनाची शांती होय. हे तत्वज्ञान आपल्याला सांगणारा तो पोपट होता, तरी कोण? राजा आणि राणी पुन्हा याच विचारचक्रात गुंग झाले होते.
एके दिवशी ऋषी वाल्मिकी त्याच्या राजवाड्यात आले तेव्हा गुण सुंदरीने ऋर्षांनी विचारले की, ऋषीवर आपल्याला है इतकं सुख आम्हाला कशामुळे मिळालं? त्या पोपटाने राजाला ते सर्व का सांगितलं? ऋषी वाल्मिकींनी ध्यान केलं, नंतर ऋषी सांगू लागले की, तुमच्या पूर्व जन्मीच्या पुण्याईनं हे फळ तुम्हाला सुख रूपात मिळालं आहे. एका ताम्रपर्णी नदीकाठी एका आश्रमात पूर्वजन्मी तुम्ही दोघे सुदेव आणि गौतमी या नावाने आनंदात राहत होते. बरेच दिवस झाले होते, पण तुमच्या पोटी संतान झाली नव्हती, म्हणुन तुम्ही भगवंत विष्णुंची आराधना केली,
भगवान प्रसन्न झाले त्यांनी पुत्रसंतान ऐवजी दुसरे काही वैभव माना असं म्हणाले, तेव्हा तुम्ही म्हणाले, भगवान पुत्रवैभवावाचून आम्हाला दूसरे काहीही नको, तेव्हा गरूडान मध्यस्थी केली आणि भगवान भक्तांची इच्छा पूर्ण करण्याचा वर दिला, तेव्हा तुम्हाला पुत्ररत्न प्राप्त झाले पण भगवान म्हणाले, ‘पुत्रसुख आणि पुत्रशोकही’.
मग गौतमीला पुत्र झाला. त्याचं नाव तुम्ही शुकदेव ठेवले. तो अतिशय सुंदर आणि खूप हुशार सुध्दा होता. सद्गुणी शुकदेव बारा वर्षापर्यंत उत्तमपणे शिकला. पण एके दिवशी तो नदीत पोहतांना बुडून मरण पावला.
पुत्राचे प्रेत मांडीवर घेऊन सुदेव आणि गौतमी नदीकाठीच शोकमग्न होऊन बसुन राहीले. त्यावर ते स्नान, तो नेमधर्म, तो उपवास, तो महिना होताअधिकमास. अधिकमासात ते पुण्यकर्म तुम्हाला म्हणजे सुदेव आणि गौतमीला अचानकच घडलं होतं, तेव्हा भगवान मुरलीधर पुरूषोत्तम तुमच्यावर प्रसन्न झाले. त्यांनी तुमच्या पुत्र शुकदेवाला जीवनदान दिले. आणि सुदेव व गौतमीला राजा आणि राणी होण्याचे वरदान दिले.
राजा राणीच्या पूर्व जन्माची ही कथा सांगून झाल्यावर वाल्मिक ॠषी त्या दोघांना म्हणाले, “तुम्ही मागच्या जन्मातसुख व दुःख भोगले आहे.तेंव्हा या जन्मात आनंदपूर्वक जीवन जगा.”
अधिकमासात पाळावयाचे व्रत आणि नियम :
गोवर्धनधर वन्दे गोपाला गोपरूपिणम् । गोवुलोत्सवमीशान गोविंद गोपिकाप्रियम् ॥ हा मंत्र स्नानानंतर रोज म्हणावा.
रोज सायंकाळी देवापुढे नेमाने दिवा लावावा. या अधिकमासात शक्यतो एक वेळेसच भोजन करावे. या महिन्यात एखाद्या वस्तुचा त्याग करावा. तसेच महिन्यात थंड पाण्याने स्नान करावे किंवा आवळीच्या झाडाखाली स्नान करावे.
अन्नदान सर्व दानांत श्रेष्ठ असे दान आहे. गाईला पूर्व आकाराच्या भाकरी- पोळीचा घास रोज नित्यनेमाप्रमाणे घालावा. आपल्या आराध्य देवतेचे नामस्मरण-महिनाभर सातत्याने नाव घेत जावे. नामस्मरणाचे पुण्य फार मोठे आहे.
देवदर्शन-दिवसातून एक वेळ नियमाने मंदिरात जाऊन देवदर्शन महिनाभर करावे. कथा पोथी – महिनाभर दररोज अधिक महिन्याची ही पोथी वाचावी.
(क्रमश:)
लेखक : विजय गोळेसर मोबा. ९४२२७६५२२७