मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अदानी उद्योग समूहाच्या प्रकरणात धाडकन कोसळलेले शेअर मार्केट आज जरासे स्थिरावले होते. सर्वसाधारणपणे चढ-उताराचा दिवस असला तरीही निचांकी पातळीवरून सावरण्यासाठी मदत झाली.
दिवसभरातील व्यवहारात बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व, एचसीएलटेक, आयएनएफवाय, एनटीपीसी, विप्रो, आरआयएल, मारुती या कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. तर एलटी, इंडसइंड बँक, टाटा स्टील, एचयूएल, एअरटेल, टाटा मोटर्स, आयटीसी, एसबीआय या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. पण आठवड्याच्या पहिल्या दिवशी निचांकी पातळीवरून मार्केट वधारल्यामुळे आशा निर्माण झाली. दिवसभरातील व्यवहार बंद झाले तेव्हा मुंबई शेअर मार्केटचा निर्देशांक सेन्सेक्स १६९ अंकांच्या तेजीसह ५९,५००.४१ अंकांवर स्थिरावला होता. तर राष्ट्रीय शेअर मार्केटचा निर्देशांक निफ्टी ४४.६० अंकांनी वधारत १७ हजार ६४८.९५ अंकांवर बंद झाला होता.
सुरुवातीला बीएसईचा 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स 229.21 अंकांनी म्हणजेच 0.39 टक्क्यांनी घसरून 59,101.69 वर उघडला. NSE चा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 62.40 अंकांनी घसरून 17,541.95 वर उघडला. मार्केट ओपन झाल्यावर काहीच वेळात घसरलेला सेन्सेक्स हळूहळू सावरल्यामुळे गुंतवणुकदारांच्या आशा पल्लवीत झाल्या.
आयटी सेक्टर जोरात
आठवड्याच्या पहिल्या दिवशी ट्रेडिंगमध्ये आयटी व बँकिंग क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी होती. तर फार्मा, एफएमसीजी, मेटल्स, एनर्जी, अॉईल अँड गॅस सेक्टरमधील कंपन्यांच्या शेअरमध्ये नफावसुली होती. त्यामुळे घसरण झाली. सेन्सेक्समध्ये ३० पैकी १८ कंपन्यांचे शेअर वधारले होते, तर निफ्टीमधील ५० पैकी २९ कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली.
यांना बसला फटका
शेअर मार्केटमध्ये आज सर्वसाधारण तेजी बघायला मिळाली असली तरी काही गुंतवणुकदारांना फटका बसला आहे. मागील तीन दिवसांत गुंतवणुकदारांचे ११.७८ लाख कोटींचे नुकसान झाले आहे. तर आज १.०५ लाख कोटी रुपयांचे नुकसान नोंदविण्यात आले.
Adani Group Report Share Market Todays Scenario