इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ही पुरती अडकली असल्याचे समोर आले आहे. अंमलबजावणी संचालनालयाने जॅकलिनला थेट आरोपी केले आहे. सुकेश चंद्रशेखर याच्या २१५ कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात जॅकलिन पूर्णपणे फसली आहे. ईडीने जॅकलिनविरोधात आरोपपत्र दाखल करण्याची पूर्ण तयारी केली आहे. सुकेश चंद्रशेखर गुन्हेगार असल्याचे जॅकलीनला माहीत होते आणि वसुलीत तिचा सहभाग असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे सुकेशकडून वसूल करण्यात आलेल्या पैशांचा फायदा जॅकलिनलाही झाल्याचे ईडीने म्हटले आहे.
सुकेश चंद्रशेखर प्रकरणात जॅकलिनची याआधीही अनेक वेळा चौकशी झाली आहे. रिपोर्ट्सनुसार, सुकेशने जॅकलिनला सुमारे १० कोटी रुपयांच्या भेटवस्तू दिल्याचे ईडीच्या तपासात समोर आले आहे. ईडीने प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत जॅकलिनची ७ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. सुकेशने जॅकलिनलाच नव्हे तर तिच्या कुटुंबीयांनाही मौल्यवान भेटवस्तू दिल्याचे तपासात समोर आले आहे.
त्याचबरोबर सुकेशवर वेगवेगळ्या राज्यात जवळपास ३२ गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध सीबीआय, ईडी आणि आयकर तपास सुरू आहेत. सुकेश चंद्रशेखरवर प्रभावशाली असल्याचे भासवून लोकांना फसवल्याचा आरोप आहे. मोठमोठ्या व्यक्तींसोबत फोटो दाखवून तो लोकांना फसवायचा आणि त्यांच्या कामासाठी मोठमोठे पैसे घेत असे. त्याचप्रमाणे त्याने दिल्लीतील एका व्यावसायिकाच्या पत्नीकडून २१५ कोटी रुपये वसूल केले होते आणि ओळखीच्या आधारे पतीला जामीन मिळवून देऊ असे सांगितले होते.
सुकेश तुरुंगातूनच फसवणुकीचे रॅकेट चालवत होता. सुकेश चंद्रशेखर आणि जॅकलीन फर्नांडिसचे अनेक खासगी फोटोही लीक झाले आहेत. सुकेशला जाळ्यात अडकवल्यानंतर सुकेशने जॅकलीनलाही फसवून आपल्या जाळ्यात अडकवल्याचे उघड झाले आहे. तो जेलमधून जॅकलिनला भेटवस्तू पाठवायचा आणि बोलायचा.
Actress Jacqueline Fernandez ED Charge sheet